*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित (पंडित) लिखित अप्रतिम लेख*
*तुला म्हणून सांगते*
“अगं तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नकोस हं”
“मला हे नसेल सांगण्यासारखं तर राहू दे”____इति ‘ती’
“तसं नाही गं, तुझ्याशी बोलल्यावर कसं मोकळं मोकळं वाटतं. गेले चार दिवस वाटत होतं हे तुझ्याशी बोलावं, आज भेटलीस बघ. तुझ्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आकाश पाताळ एक झालं तरी तुझ्या पोटातलं माझं गुपित काही तुझ्या ओठावर यायचं नाही”
हा संवाद म्हणजे फक्त एक उदाहरण आहे.
अगदी ती शाळेत होती तेव्हापासून ते आता जवळपास चाळीशीच्या उंबरठ्यावर देखील पदोपदी तिला असा अनुभव येतोच आहे. रंगानं तशी काळी सावळीच, उंची पुरी तर नाहीच. घरात भावंडांच्या मानाने फारच कमी हुशार, आवड निवड सगळीच यथा तथा त्यामुळे तिचं मत एवढं महत्त्वाचं नव्हतंच कधी; त्यामुळे अंगात भरपूर पोटेन्शिअल असलं तरी ते बाहेर कधी आलेच नाही. थोडेसे डावलल्याचे बीज लहानपणीच रुजू लागलं होतं. त्यामुळे काहीशी अबोल झालेली पण इतरांना शिष्ठ वाटणारी अशी ती सगळ्यांची हक्काची सीक्रेट ठेवींची बँक मात्र बनली होती. अगदी छोटी मुलं खेळणी लपवून ठेवताना, लपाछपीत कुठे भारी जागा आहे लपायची, वर्गातल्या मज्जा मस्ती किंवा दंग्यांमागचं खरं कारण वगैरे सगळ्या गोष्टी तिलाच येऊन सांगत.
कुठल्याही वयाच्या माणसाला आपली गुपित तिला सांगायला संकोच वाटतच नव्हता कसे कसे पैसे जमवून मित्रासाठी भेटवस्तू घेतली कुठे दिली ते दोघे कुठे भेटतात याची इथंभूत माहिती हिला असायची कारण ही कुणाला सांगणार नाही याची 101% खात्री! नवरा बायकोतल्या बेडरूम मधल्या नाजूक गोष्टीही हिला माहिती असायच्या. असं काय होतं हिच्यात की ‘ती’ सगळ्यांना एवढी खात्रीशीर वाटत असेल?
नेहमी आपण जेव्हा बघतो की दोन-तीन बायका एकत्र जमून काही बोलत असतात तेव्हा कुठल्याही ज्वलंत प्रश्नासारखं जी व्यक्ती उपस्थित नाही त्याबद्दलच बोलतात आणि जनरली ते काही फारसं चांगलं असतं असं नाही. अगदी हाय सोसायटीतल्या किटीत असू दे किंवा नवरे ऑफिसला गेल्यावर दाराच्या उंबऱ्यात उभे राहून गप्पा मारणाऱ्या बायका असू देत… आपले आपले घरगुती विषय झाल्यावर त्यांची गाडी घसरतेच तिसरीच्या गोष्टींवर. मग ते खरं खोटं किती किंवा मसाला लावून लावून आपल्यापर्यंत आलेले किती त्याची शहानिशा कोण करतय? या बायकांची पण एक गंमत लक्षात आली की आपली गुपिते त्या सरसकट प्रत्येक शेजारणीला सांगत नाहीत. अशावेळी त्या बरोबर ‘ती’ भेटण्याची वाट बघतात आणि मगच आपलं मन मोकळं करतात खरं आहे ना?
मुळातच माणसाला कुठेतरी व्यक्त होण्याची नितांत आवश्यकता असते. जसे दुःख तो आत मध्ये साठवून ठेवू शकत नाही तसंच सुखही त्याला एकट्याला पचत नाही. ‘आनंद दिल्याने वाढतो’ आणि ‘दुःख बोलल्याने कमी होतं’ असंच काहीसं. मग या मागची आपली भूमिका किती निकोप निस्वार्थी आहे हे पटवून द्यायला तसा विश्वासू माणूस शोधावा लागतो.बरं ज्याला आपण हे सांगतोय त्याच्याकडून फारशी अपेक्षा नसतेच कधी,फक्त तिने सगळं ऐकून घ्यावे आणि आपल्या परिस्थितीला थोडी सहानुभूती मिळावी एवढेच त्यामागे प्रयोजन असते. पण होतं काय की हे सगळं गुपित सांगितल्यामुळे सांगणाऱ्याला कमालीचा हलके हलके वाटायला लागते. मोठे ओझे खांद्यावरून खाली आल्यासारखे वाटते. पण ऐकणाऱ्याला ती गोष्ट नक्कीच अस्वस्थ करू शकते …पण फक्त दोन-तीन दिवस फार नाही. कारण म्हणतात ना परदुःख शितल असते आणि आनंदाची गोष्ट असेल तर प्रश्नच नाही.
फक्त इथे ऐकणार्याची नैतिक जबाबदारी वाढते, त्या केस मध्ये जिथे सांगणाऱ्याने आवर्जून सांगितलेले असते की ‘कुणाला सांगू नकोस’. तेव्हा हा जो विश्वास त्याने तुमच्यावर टाकलेला असतो तो कधीही म्हणजे कधीही अगदी कुठल्याही परिस्थितीत तोडायचा नसतो. ही एक प्रकारची नैतिकता असते जी आजकाल फार दुर्मिळ होत चालली आहे. लोक उलटे अशा गोष्टींचे भांडवल करून दुसऱ्याला बदनाम करताना दिसतात. याने होते काय तर तुमच्यावरचा विश्वास तर उडतोच पण सगळ्या जगावरचा देखील उडू शकतो. माणूस निराशेच्या गर्तेत खोल खोल जाऊन एखाद्या नाजूक क्षणी चुकीचे पाऊल उचलू शकतो. का बरं आज काल इतक्या आत्महत्या वाढल्या आहेत? का लोकांना कुणाशी बोलण्याची इच्छा राहिली नाही? का मानसोपचार तज्ञांकडची गर्दी वाढत चाललेली आहे? शेतकऱ्यांपासून ते मोठ मोठ्या पदावरच्या व्यक्ती, फिल्म स्टार्स समुपदेशक सुद्धा आणि विद्यार्थी देखील अशा सर्व स्तरातील व्यक्तींच्या आत्महत्यां मागे त्यांच्या मनावरचे प्रचंड दडपण कारणीभूत आहे. कुठेही मोकळे न होणे किंवा होता न येणे ही वाटते तितकी साधी गोष्ट मुळीच नाही. वेळीच जर त्यांना एखादी विश्वासू व्यक्ती भेटली असती तर कदाचित तेवढ्या गोष्टीतूनही मनावरचा असह्य ताण हलका होऊन बरेच जीव वाचू शकले असते.
व्यक्त होणे जितके आवश्यक आहे तितकेच समोरच्या व्यक्तीचे सहानभूतीपूर्वक ऐकून घेणे हघ महत्त्वाचे आहे. हल्ली लोकांची मानसिकता फारच उथळ झालेली दिसते. छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींनी देखील लोक टोकाचे पाऊल उचलतात. आई अभ्यास कर म्हटली, वडिलांनी मोबाईल दिला नाही, कॉलेजला जायला गाडी नाही, प्रेमातली प्रतारणा, नोकरी मिळत नाही, लग्न जमत नाही… अशी एक ना कित्येक कारणे मिळतात या कमकुवत मनांना आत्महत्या करण्यासाठी. ते चूक आहे का बरोबर हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे आणि मी त्यातली तज्ञ ही नाही. पण आपण नेमके अशावेळी ‘ति’च्यासारखे विश्वासार्ह होऊया जी सगळ्यांचं फक्त ऐकून घेते. काय हरकत आहे जर आपल्या मार्फत कुणाचे ताणतणाव निवळणार असतील तर? हा, फक्त एक करायचं अशावेळी; कुणाला सल्ला द्यायचा नाही आणि अगदी दिलाच तर नैतिकतेला धरून चांगलाच द्यायचा. शक्यतो त्यांच्या कथेत आपण वाहवत जायचं नाही किंवा मध्यस्थीही करायची नाही. आपल्याला स्वतःला त्रास होईल अशा रीतीने कुठेही गुंतून पडायचे नाही. नाहीतर मग आपलाच उद्धार ठरलेला. थोडक्यात म्हणजे न्यूट्रल राहायला शिकायचे. गॉसिपिंग तर मुळीच करायचे नाही. ‘ती’ का बरं सगळ्यांना एवढी विश्वासार्ह वाटत असेल? कारण तिला एक जबरदस्त वरदान मिळाले होते ते म्हणजे विस्मरणाचे, जे की सगळ्यांकडेच असते. ते वापरायचे फक्त. मगापासून मी एवढे तिच्याबद्दल बोलते आहे पण ‘ति’चे नाव नाही सांगितले तुम्हाला? असू दे… तेवढे गुपित तर मीही ठेवलेच पाहिजे हो ना?
अंजली दीक्षित-पंडित
छ.संभाजीनगर