नगरपंचायतीतील विरोधी नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा
कणकवली :
कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकानजीक नगरपंचायतीचे जुने भाजी मार्केट आहे.तिथे असलेले जुने सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतागृह तोडण्यात आले आहे.त्यामुळे व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे. येत्या आठ दिवसात तिथे पर्यायी व्यवस्था निर्माण न केल्यास विरोधी नगरसेवकांकडून नागरिकांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा नगरपंचायतीतील विरोधी पक्षाचे गटनेते सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना दिला आहे.
कणकवली नगरपंचायतने जुन्या भाजी मार्केटच्या जवळ असलेले एकमेव सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतागृह तोडले आहे. त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
हे स्वच्छतागृह तोडल्याने बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्ग आणि नागरिक यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतने भाजी विक्रेते, फिरते व्यापारी तसेच कणकवलीतील नागरिकांसाठी तात्पुरत्या तरी शौचालयाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कणकवली शहरामध्ये एकही सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने प्रत्येकाला एसटी बस स्थानकावर स्वच्छतागृहासाठी जावे लागते. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
नवीन स्वच्छ्ता गृह उभारणीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत कणकवलीतील व्यापारी आणि नागरिक यांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान , बुधवारी नगरपंचायतीतील विरोधी पक्षाचे गटनेते सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या समवेत संबधित स्वच्छतागृहाची पाहणी केली.तसेच तेथील व्यापारी, विक्रेते,नागरिक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी येत्या आठ दिवसात स्वच्छतागृहाची पर्यायी व्यवस्था निर्माण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला