You are currently viewing कवी केशवसुत जन्मदिन १५ मार्च

कवी केशवसुत जन्मदिन १५ मार्च

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*कवी केशवसुत जन्मदिन १५ मार्च*
*****************************

जन्म – १५ मार्च १८६६
स्मृती – ७ नोव्हेंबर १९०५ (हुबळी)

*एक तुतारी द्या मज आणुनि*
*फुंकिन मी जी स्वप्राणाने*
*भेदुनि टाकिन सगळी गगनें*
*दीर्ध जिच्या त्या किंकाळीने*
*अशी तुतारी द्या मजलागुनी*

ब्रिटिश शासनाच्या दरम्यान स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी संघर्षाचे आव्हान करणारी प्रेरणादायक कविता लिहिणारे कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत…!
रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी जन्मलेले कवी केशवसुत हे मराठी कवितेतील आद्यकवी म्हणून ज्ञात आहेत. आधीच्या काळात संतकाव्य व पंतकाव्य हीच परंपरा होती, या परंपरेला मोडून केशवसुतांनी अन्य विषयांवर काव्यरचना लिहिल्या. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ठ पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितांना स्वच्छंद आणि मुक्त स्वरूपात केशवसुतांनी सर्वांसमोर आणले. कवी केशवसुत यांनी मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण दिले. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणाऱ्या कवी केशवसुतांनी आपल्या कवितांतून स्त्री पुरुषांमधील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. आपले क्रांतिकारक सामाजिक विचार व्यक्त करताना ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ या ‘तुतारी (१८९३), ‘नवा शिपाई'(१८९८) ‘गोफण केली छान’ (१९०५) अशा कवितांमधून “सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले.
कवी केशवसुत यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्वे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि विशाल मानवतावाद. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’(१८९३), ‘म्हातारी'(१९०१), ‘हरपले श्रेय'(१९०५), या त्यांच्या गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी. इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. इंग्रजी कवितेतील “सॉनेट” हा काव्यप्रकार त्यांनी ‘सुनीत’ या नावाने प्रथमच मराठीत रूढ केला, शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही आणली. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे, आत्मलेखन उत्कट अनुभूतीचे असते असे सांगत स्फुटलेखन केले. केशवसुतांच्या कवितेत लालित्य कमी परंतु काहीशी राकट, रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यपद्धतीशी सुसंगत ठरते. कवी केशवसुतांच्या काव्यात वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा फार मोठा प्रभाव होता.
गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी सारखे कवी आपल्याला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत. “तुतारी-मंडळ” या नावाने एक मंडळही स्थापन झाले होते. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधना नंतर ह.ना. आपटे यांनी प्रकाशित केला. केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’, ‘संध्याकाळ’, ‘स्फूर्ती’, ‘कवितेचे प्रयोजन’, ‘आम्ही कोण’ ‘मूर्तीभंजन’, ‘रांगोळी घालताना पाहून’ अशा एकापेक्षा एक सरस १३५ कविता आज उपलब्ध आहेत.
केशवसुतांचे शिक्षण खेड,बडोदा, वर्धा, नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणी झाले.काहीकाळ त्यांनी मुंबईत हंगामी नोकऱ्या केल्या. त्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी सावंतवाडी, भडगावं, फैजपूर, धारवाड आदी ठिकाणी नोकरी केली. केशवसुतांचे ७ नोव्हेंबर १९०५ साली हुबळीला गेले असता प्लेगने निधन झाले.
कविवर्य केशवसुतांच्या सन्मानार्थ भारत सरकारने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर सावंतवाडी राज्यरानी गाडीचे नाव बदलून कवी केशवसुतांच्या तुतारी कवितेच्या शीर्षकावरून *”तुतारी एक्सप्रेस”* असे नामकरण केले आहे.

आद्यकवी केशवसुत यांची अजरामर झालेली हीच ती काव्यरचना…👇
*”तुतारी…!”*

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

*आद्यकवी केशवसुत यांना शत शत नमन !*

【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी

*सौजन्य: गूगल*

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =