घुमट वादन ठरले विशेष आकर्षण
देवगड :
देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात शिमगोत्सवाची सांगता देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शुक्रवारी सायंकाळी झाली.
मुणगे भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सवाला होळी उत्सवाने सोमवारी सुरुवात झाली. सोमवारी दुपारी बांबरवाडी येथून होळी साठी पोपळीचे झाड देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच बारापाच मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आणण्यात आले. सायंकाळी वाजतगाजत होळी उभारण्यात आली. गुरव यांच्याकडून होळीची विधीवत पूजा झाल्यानंतर आकार ठेवणे, नैवेद्य, गावघराचे गाऱ्हाणे, नारळ ठेवणे, गावकरांमार्फत गाऱ्हाणे घालून शिमगोत्सवाची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ७ मार्च रोजी रात्री भगवती मंदिर व होळीजवळ पारंपरिक पद्धतीने कारिवणेवाडी, बांबरवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी या मंडळांची खेळ व नाचगाणी, होळीजवळ कवळ पेटविणे, भगवती मंदिरात बांबरवाडी मंडळाचा तमाशा, तर तिसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी गावांमध्ये खेळे खेळण्यास सुरुवात झाली. चौथ्या दिवशी ९ मार्च रोजी रात्री होळीजवळ व भगवती मंदिरात रोंबाट खेळ व नाचगाणी, तर पाचव्या दिवशी १० मार्च रोजी दुपारी भगवती मंदिरात बांबरवाडी यांचा तमाशा, सर्व मंडळांची पारंपरिक रोंबाट खेळ, होळीजवळ रोंबाट, नवसफेड व नवीन नवस गाऱ्हाणी, भगवती मंदिरात रोंबाट, देवीच्या सभा मंडपात नाचगाणी, देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. सांगता कार्यक्रम प्रसंगी घुमट वादन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.