ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –
चीन आणि भारताची सातत्याने छोटी मोठी लढाई चालू आहे. २०२० पर्यंत अनेक भागांमध्ये चीनने आपला भाग घेऊन कब्जा केला आहे. भारतासमोर हा नेहमीच प्रश्न राहिला आहे कि चीनबरोबर युद्ध झाले तर पाकिस्तान काय करणार? याला स्पष्ट उत्तर आहे की २०२० पर्यंत भारताला आपले सैन्य पाकिस्तानच्या विरोधात काढून चीन विरुद्ध हलवावे लागले. त्यामुळे दोन भागा विरोधात हे युद्ध भारताला जडच आहे. आज भारतीय सैन्याची या दोन्ही भागात युद्ध करण्याची पूर्ण तयारी नाही. हवाई दलाचे भारतात बेचाळीस स्कॉर्डन पाहिजेत, ते फक्त तीस स्कॉर्डन आहेत. सैन्य दलात आणखी एक लाख सैनिकांची गरज आहे. पण कोरोना काळामध्ये सैनिकांची भरती बंद होती आणि आता जी अग्निपथ योजना सुरू आहे ती पूर्ण व्हायची गरज आहे. त्यामुळे या परिस्थितीत युद्धाला कसे सामोरे जाऊ शकतो? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. १९६२ प्रमाणे तोंडच्या हवेला बंदुकीने उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा व्यवस्थितपणे सोडवावा लागणार आहे.
चीनच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया बरोबर एक QUAD नावाचे गटबंधन तयार करत होतो. पण याचा धोका आहे की आपला पारंपारिक मित्र रशिया नाराज होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपला अमेरिकेबरोबरचा सुरक्षा करार होणे अशक्य आहे. कारण QUAD सुरक्षा करार रशिया आणि चीनला बिलकुल आवडणार नाही. म्हणून भारताने त्यावर फार उत्सुकता दाखवलेली नाही. परिणामत: चीन बरोबर युद्ध झाले तर या सुरक्षा कराराचा आपल्याला अजिबात उपयोग होणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यात रशियाचा उपयोग करून चीनवर दबाव आणणे व चीनबरोबर युद्ध टाळणे हा एक भाग असू शकतो. कुठल्याही परिस्थितीत चीनच्या संघर्षामुळे पाकिस्तानला त्यातून फायदा उठवू देणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. पाकिस्तानला चीन-भारत युद्ध पाहिजेच आहे, तसे झाले तर त्याला काश्मिरमध्ये हस्तक्षेप करायला संधी मिळणार आहे. म्हणून चीन बरोबरच्या संघर्षामध्ये आज पाकिस्तान हा एक मोठा भाग झाला आहे. आता त्याचा विचार सरकार करतच असणार व सैन्यदलाचा सुद्धा याबाबतीत असाच समज आहे.
चीनबरोबरचे युद्ध म्हणजे घनघोर होणार. १९६२ प्रमाणे आपण अजिबात हतबल नाही. चीनबरोबर युद्ध करण्याची प्रचंड क्षमता आहे. पण त्यासाठी पूर्ण तयारी सुद्धा करावी लागणार आहे. त्यावर प्रचंड खर्च आहे. जर इतर विकासाचे लक्ष साधायचे असेल, तर हा खर्च परवडण्यासारखा नाही. याबाबत सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण १९६२ चे युद्ध आपण हरलो. त्यात सैनिक कधी कमी पडले नाहीत. तुटपुंजा सामग्रीने आणि तयारीने सैतान सिंग सारख्या सैनिकांनी शेवटची गोळी आणि शेवटच्या जवानापर्यंत लढत दिली. चुशूलच्या युद्धामध्ये सैनिकांची वीर गाथा सांगायला एकच जवान परत आला. जेव्हा बंदुकीत घालायच्या गोळ्या संपल्या, तेव्हा सैनिकांनी दांड्याप्रमाणे रायफलीचा वापर करून शेवटच्या जवानापर्यंत युद्ध केले आणि शहीद झाले. हा असीम त्याग आपल्याला विसरता येत नाही. पुढील युद्धामध्ये जिवितहानी प्रचंड होणार आहे. दोन्हीकडून कडवी झुंज दिली जाणार आहे. त्याची पूर्ण मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी जवानांचे मनोबल फारच मजबूत करावे लागणार आहे. या मनोबलावर मी पुढच्या लेखांमध्ये लिहिणारच आहे, कारण ऑफिसरशाहीचा दुरुपयोग बंद झाला पाहिजे व सर्व जवानांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने वागवले पाहिजे हा आजच्या काळातील एक फार मोठा विषय आहे. सैनिक काय मशीन नाहीत, पण हाडामासाची माणसे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांमध्ये लढण्याची आणि बलिदान करण्याची स्पर्धा होती. तशाच प्रकारची जिद्द आणि मनोबल बनवावे लागणार आहे. डोंगराळ भागात युद्ध वेगळे असते, त्यात रणगाडे किंवा वायुदल, नौदल चालत नाहीत, फक्त पायदळ टिकू शकते.
चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा सातपटीने मोठी आहे. त्या उलट भारताचे संरक्षण बजेट हे केवळ चीन पेक्षा एक चतुर्थांश आहे. तरी देखील भारताने नेहमी चीनला रोखण्याचे काम केले आहे. १९६७ ला नाथुलाच्या युद्धामध्ये हे दिसून आले आहे. २०१३ मध्ये देपसांग भागात ५ चौक्यांवर चीनला रोखून ठेवले आणि चीनने घुसखोरी केली, तिथे याचे प्रत्युत्तर भारताने चीन भागात घुसून केले. चीनच्या सीमेवर अनेक भागांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. या जागा लक्षात ठेवून चीन विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. भारताचा आक्रमक पवित्रा मर्यादितच राहिला आहे. कारण आक्रमक पवित्र्यामधून युद्ध सुरु होऊ शकते. आता सुद्धा ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथे हत्याराचा वापर नाही झाला. शारीरिक धक्का-बुक्की झाली. त्यावरून दोन्ही सैन्यांनी संयम राखल्याचे दिसते. सेनादल प्रमुख जनरल पांडेच्या म्हणण्याप्रमाणे युक्रेन युद्धामुळे आपले जे गोळाबारूद, हत्याराचे सुट्टे भाग आणि हत्यारे याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. निधी नसल्यामुळे सैन्यदलाची फक्त १० दिवस घनघोर लढण्याची क्षमता आहे. ही क्षमता ५० दिवस लढण्याची असली पाहिजे. त्याबद्दल सरकार योग्य ती भूमिका घेत आहे.
आजच्या परिस्थितीत सप्टेंबर २०२१ पर्यंत लेह जिल्ह्याचे अधिकारी व सुरक्षा दल काराकोरम खिंडीपर्यंत गस्त घालू शकत होते. डिसेंबर २०२१ ला सैन्याने दौलत बेगओल्डी येथे चौक्या उभ्या केल्या. त्याबरोबर भारतीय अधिकाऱ्यांचा आणि सैन्यदलाचा मुक्त वावर बंद झाला. त्यानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा संमेलनात पंतप्रधान व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जो अहवाल ठेवला त्यात ७७५ कि.मी. एल.ए.सी.ची परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यामध्ये भारताची सावध भूमिका निदर्शनास येते व चीन सैन्याची आक्रमक भूमिका दिसते. २०२० च्या पूर्वीची स्थिती पूर्ववत करण्यासाठी काहीच हालचाल दिसत नाही. १२ जानेवारी, २००३ च्या जनरल पांडेच्या पत्रकार परिषदेमध्ये जनरल पांडेने स्पष्टपणे म्हटले कि, भारतीय सेना एक ताकदवान संरक्षक भूमिका घेत आहे आणि चीनला सद्याची परिस्थिती बदलण्याची कुठलीही संधी देत नाही. जनरल पांडे म्हणाले कि, संघर्षाच्या सात भागामधून जसे देपसांग, गालवन, गोगरा, कागजंग, पँगोग तलावाचा उत्तर भाग, कैलास श्रंखल आणि देमचॉक पैकी पाच भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. याचा अर्थ एवढाच आहे कि समोरासमोर उभ्या ठाकलेल्या सैनिकांमध्ये काही किलो मीटर अंतर निर्माण करण्यात आले आहे. पण त्यापुढे चीनने आणखी अंतर वाढविण्याला नकार दिला आहे. बऱ्याच भागात पूर्वी १०० कि.मी. चे ही अंतर असायचे. पुढे जाऊन आणखी सैन्य जे या भागांमध्ये गेल्या ३ वर्षात आले होते, त्यांना परत नेण्याची भाषा अजून पर्यंत झाली नाही. सैन्य पाठीमागे घेण्यामध्ये काही नुकसान होते. जसे पँगोग तलाव आणि कागजंग भाग येथे आपला काही भाग चीनकडेच राहिला. तिथे सैन्य परत घेण्यात आले नाही आणि चीनने याबद्दल चर्चा करायला स्पष्ट नकार दिला आहे. बराचसा असा भाग जो चीनच्या ताब्यात राहिला तो भारताला मान्य नाही. व आजची परिस्थिती ही भारताच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही. या धुमचक्रीत आर्थिकदृष्ट्या सुद्धा भारताला हानी होत आहे. चीन आपल्यापेक्षा पुढे जाऊन आर्थिक दृष्ट्या वरचढ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान अशा दृष्टचक्रात भारताला वाट काढावी लागणार आहे. त्यातच अमेरिकेची पाकिस्तानला पूर्ण मदत व पाकिस्तानकडून न थांबलेले दहशतवादी हल्ले हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण करत आहेत. ही परिस्थिती ओळखून भारताच्या जनतेने आणि राज्यकर्त्यांनी एक जबरदस्त अशी आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शस्त्र आणि गोळाबारूद मध्ये आपण कमी पडता नये व युद्धभूमीवर चीनला धडा शिकवायला संपूर्ण तयारी झाली पाहिजे. यासाठी केवळ घोषणा देऊन चालणार नाही तर सत्य परिस्थिती भारतीय जनतेसमोर आणून युद्धाची पूर्ण तयारी केली पाहिजे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९