कोंडूरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे – हेमंत मराठे
सावंतवाडी :
कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जाचे होत नसल्याची तक्रार मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे काम करत असताना अत्याधुनिक यंत्रसामुग्री असतानाही रस्त्याचा पृष्ठभाग हा एका लेवल मध्ये येत नसून डांबरीकरण काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याचे मराठे यांना दिसून आले.
त्यामुळे अधिकारी एसीत आणि ठेकेदार खुशीत आणि काम दूषित अशी स्थिती या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची झाली आहे. यामुळे या कामाबाबत व अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती बाबत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागच्या सावंतवाडी कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना फोन करून काम कशाप्रकारे चालले आहे या संदर्भातील तक्रार केली आहे. याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही याबाबत तक्रार देणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.
या मार्गावर यापूर्वी यां रस्त्याचे ज्या ठेकेदाराने काम करत असताना ज्या चुका केल्या त्यामुळे या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले व रस्ता वाहतुकीसाठी खड्डेमय बनला. तशीच पुनरावृत्ती हे काम करत असताना झाली तर त्याचा त्रास भविष्यात वाहनधारकांना रस्ता खड्डेमय होऊन होणार आहे.
तरी कार्यकारी अभियंता यांनी याबाबत ठोस उपाययोजना करून सुरू असलेले काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे आवाहन मराठे यांनी केले आहे. अन्यथा या दर्जाहीन कामा विरोधात मला उपोषण छेडावे लागेल असाही इशारा मराठे यांनी दिला आहे.