*राष्ट्रीय किर्तनकार क्रांतिगीता महाबळ यांची विशेष उपस्थिती*
येरवडा (गुरुदत्त वाकदेकर) :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी कारावास भोगलेल्या तसेच हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांविषयी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी राष्ट्रभक्तीपर निबंधातून विचार व्यक्त केले तसेच त्यांच्या राष्ट्रभक्तीपर विचारांबद्दलची जाणीव मांडली. मुंबई येथील रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या देशभक्तीपर निबंध स्पर्धेत येरवडा कारागृहातील महिला व पुरुष बंदिवानांनी आपला लक्षणीय सहभाग नोंदवला आहे.
यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना राष्ट्रीय कीर्तनकार आणि विचारवंत क्रांतिगीता महाबळ यांनी स्पर्धकांना राष्ट्रभक्तीच्या विचारांबाबत प्रोत्साहित केले. प्रत्येकाने आपले देशाबद्दल विचार व्यक्त केले पाहिजे तसेच आपले कर्तव्यदेखील समजून घेतले पाहिजे. लोकमान्य टिळक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी राष्ट्राबद्दलचे आपले विचार तसेच कृती कारागृहातून सिद्ध केली. मंडालेसारख्या तुरुंगातून किंवा अंदमानच्या कोठडीतून या दोघांनीही क्रांतीची ज्योत तेवत ठेवल्यामुळेच अनेकांनी लढा दिला तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या चळवळीला व्यापक स्वरुप आले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारागृहाचे अधिकारी, शिक्षिका रजनी मोटके तसेच मान्यवर आणि संस्थेच्या संचालिका नयना शिंदे उपस्थित होत्या. रामचंद्र प्रतिष्ठानच्या या राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धा राज्यभर होत असून त्याला बंदिवानांकडून उत्सफूर्त आणि विशेष प्रतिसाद मिळत आहे.