You are currently viewing असच एकदा….

असच एकदा….

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर, गोवा लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*

*असच एकदा*…….

असच एकदा…..
विचारलं मी पानांना
फांद्याफांद्यातून डोकावणाऱ्या
हिरवट पोपटीसर पल्लवीला…..
कसं काय चाललय तुमचं…..?
म्हणतात कशा…..,
आमचं तर असच असतं….
शिशीरात पानगळीतून
जायचं गळून…. पाचोळा होत
वृक्षाच्या पायथ्याशी राहायचं पडून….!
येणाऱ्या जाणाऱ्या पावलांकडून तुडवत…..
सैराट वाऱ्यासवे वावटळीत राहायचं फिरत…..!
पण…, पण, तरीही उगवयाच पुन्हा फांद्यांवर
ताजी टवटवीत पालवी फुटून
बिजांकुरातून नवीन पर्ण उगवत…..
हीच तर आहे निसर्गाची सृजनता….!!
एकदा असच विचारलं मी सुमनांना
तुमचं कसं काय चाललय…..
म्हणे……, आमचं तर असच असतं….
सकाळी फुलायचं नि, संध्याकाळी
जायचं पार कोमेजून…..
कधी कळी फुललण्याआधी तोडून नेलं तर….
तसच फुलायचं पर्णहीन, फांद्याविना….
कधी देवाच्या पायाशी तर कधी,
ललनेच्या केसात राहायचं सजून….
नि, रात्री कचरा होऊन कचरापेटीत….!
केव्हा निर्माल्य तर… कचरा
एकदा असच विचारलं मी सरितेला, तिच्या वाहत्या प्रवाहाला……,
तर म्हणते कशी,…..
उगमापासून जे धावत सुटायचे ते
सागर…. प्रियकराच्या कवेत व्हायचं विलीन……..!
वाटेतल्या गावाला, शेताला, किनाऱ्यालगतच्या वस्तीला आणायचा बहार…..
नव जीवन…. नाविन्य चैतन्याचा….
दगडधोंड्यातून वाट काढत….
झुळझुळ, खळखळत….
राहायचं आपलं वहात…. कधी
संथ…… किनाऱ्यावरच्या गोट्यांवर
वहात…. सतत…. अविरत
पूर्णपणे सागर भेटीत विलीन झाल्यावर
मग राहत नाही माझं अस्तित्व…
नामशेष…. मी!
समुद्राच्या खाऱ्या पाण्यात माझी गोड चव…. जाते मिसळून…..!
तरीही…. तरीही मी असते वहात…. धावत….. सागर तळाशी जायला….!
एकदा…. एकदा असच विचारलं मी एका नारीला… सुशिक्षित, आधुनिक स्त्रीला….
म्हणते कशी ती……,
कितीही शिकलं, ह्या आधुनिक सुधारीत जीवन शैलीत अजूनही स्त्रीला मिळतेय दुय्यम स्थान…..!
पुरुषाची इच्छा, मत्तेदारी…. वर्चस्व
सगळंच कसं ठेचून निघतय स्त्रीचं अस्तित्व…..!
जरी आज स्त्री, पुरुष समान हक्क असेल तरी….. नाही तरीही….!!
हीच तर आयुष्याची वास्तवता……

एकदा…. एकदा असच मी……,

*मानसी जामसंडेकर*

*गोवा*

प्रतिक्रिया व्यक्त करा