*दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात तारा नॉरिस, शफाली आणि लॅनिंग चमकल्या, आरसीबीचा मोठा पराभव*
*लागोपाठ दुसर्या सामन्यात धावसंख्या दोनशे पार*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने रविवारी (५ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ६० धावांनी पराभव करून मोहिमेला सुरुवात केली. शफाली आणि लॅनिंग यांनी महिला प्रीमियर लीगमध्ये धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दिल्लीने आरसीबीविरुद्ध दोन गडी गमावून २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत आठ गडी गमावून १६३ धावाच करू शकला.
दिल्ली कॅपिटल्सकडून अमेरिकेच्या तारा नॉरिसने २९ धावांत ५ बळी घेतले. आरसीबीची एकही फलंदाज तिच्यासमोर तगली नाही. कर्णधार स्मृती मंधानाच्या ३५, हीदर नाइटने ३४ आणि मेघन शटने ३० धावा केल्या. एका टप्प्यावर, संघाने १४व्या षटकात ९६ धावांत सात विकेट गमावल्या होत्या, परंतु हीदर नाइट आणि मेगन शट यांनी आठव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून आरसीबीच्या पराभवाचे अंतर कमी केले.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची १९ वर्षीय आक्रमक फलंदाज शफालीने ४५ चेंडूंच्या खेळीत दहा चौकार आणि चार षटकार मारले. तिने ८४ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाला आयसीसी टी२० विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार लॅनिंगने ४३ चेंडूंच्या खेळीत १४ चौकारांसह ७२ धावा केल्या.
इंग्लंडची कर्णधार हीथर नाईटने आपल्या फिरकीने विरोधी कर्णधार लॅनिंगला बाद केले आणि रिचा घोषने एका चेंडूच्या आत शफालीचा विकेटच्या मागे चांगला झेल घेतला तेव्हा १५व्या षटकात आरसीबीला फलंदाजीसाठी अनुकूल ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिली विकेट मिळाली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लॅनिंग आणि शफाली यांनी ८७ चेंडूत १६२ धावा जोडून २०० हून अधिक धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर मारिजन कॅप आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी ५९ धावांची अखंड भागीदारी केली. कॅपने १७ चेंडूत नाबाद ३९ आणि जेमिमाने १५ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.
आपल्या नेतृत्वाखाली भारताला १९वर्षांखालील विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या शफालीने खराब चेंडूंचा चांगलाच समाचार घेतला. तिने ३१ चेंडूत मेगन शुटच्या गोलंदाजीवर आपले अर्धशतक पूर्ण केले. नाईटच्या चेंडूवर चौकार मारून लॅनिंगने ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने १२ चौकार मारले. संघाने दहा षटकांत शंभर धावांचा टप्पा ओलांडला होता. महिला प्रीमियर लीगमध्ये कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने सात गोलंदाजांना आजमावले. नाणेफेक जिंकून मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
तारा नॉरिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.