You are currently viewing व्यापारी महासंघाचा ३६ वा मेळावा मालवणात भव्यदिव्य होणार

व्यापारी महासंघाचा ३६ वा मेळावा मालवणात भव्यदिव्य होणार

व्यापार, पर्यटन, मत्स्य, कृषी पाच दिवसीय भव्य प्रदर्शन ; मालवण तालुका व्यापारी संघाच्या बैठकीत निर्णय

मालवण

मालवण व्यापारी संघाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तर मालवण तालुका व्यापारी संघाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा जिल्हा व्यापारी मेळावा पुढील वर्षी ३१ जानेवारीला मालवणात होणार आहे. हा तिरंगी योग साधून जिल्हा व्यापारी मेळाव्याच्या वेळी पाच दिवसीय भव्य व्यापारी प्रदर्शन मालवणात आयोजित करण्याचे मालवण तालुका व्यापारी संघाच्या स्नेहसंमेलनात ठरविण्यात आले. या प्रदर्शनात व्यापार, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व कृषी व्यवसाय या व्यापारी घटकांचा समावेश असणार आहे. तसेच यनिमित्त व्यापाऱ्यांची सागर ते सह्याद्री अशी २०० किमी अंतराची लाखो रुपये पारितोषिकांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

मालवण तालुका व्यापारी संघाचा स्नेहमेळावा मालवण चिवला बीच धुरीवाडा कुरण येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, मालवण शहर व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, नितीन वाळके, अरविंद नेवाळकर, अशोक सावंत, दीपक भोगले, विजय केनवडेकर, गणेश प्रभूलकर, नाना पारकर, राजन नाईक, द्वाराकनाथ घुर्ये, मुकेश बावकर व इतर व्यापारी उपस्थित होते.

मालवणात होणाऱ्या व्यापारी प्रदर्शनासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग खाते, पर्यटन खाते, एमटिडीसी यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रदर्शनासाठी शासकीय मदतही घेतली जाणार आहे. या प्रदर्शनात व्यापार उद्योगातील बदलते ज्ञान, यंत्रसामग्री याविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे. इतर वेळी आयोजित होणारी कृषी व उद्योग प्रदर्शने यांना व्यापाऱ्यांना आपल्या कामातील व्यस्ततेमुळे जाता येत नाही, त्यामुळेच व्यापाऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेत यावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन वाळके यांनी दिली.

यनिमित्त मालवणच्या वेशीवर भव्य स्वागत कमान देखील उभारण्यात येणार आहे. व्यापारी संघाच्या सभासदांना ओळखीसाठी लोगो देण्यात येणार आहेत. आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी आपत्ती निवारण कोष निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व्यापारी पतसंस्थेत व्यापाऱ्यांच्या पाच वर्षासाठी ठेवी ठेवण्यात येणार असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून आपतग्रस्त व्यापऱ्यांना निधी देण्यात येणार असून तो त्यांनी बिनव्याजी परत करावयाचा आहे. मालवण व्यापारी संघाच्या युवा, महिला व पर्यटन समित्या गठीत करण्यात येणार आहेत, मालवण व्यापारी संघांचे कार्यालय १ एप्रिल पासून मामा वरेरकर नाट्यगृह शेजारील इमारतीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नितीन वाळके यांनी दिली.

१६ एप्रिल रोजी सागर ते सह्याद्री अशी २०० किमी अंतराची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. हि रॅली निवती येथून सुरू होऊन शिरशिंगे, आंबोली अशा मार्गे कुडाळ येथे संपणार आहे, अशी माहितीही वाळके यांनी दिली.

या स्नेहसंमेलनात मालवण तालुका व शहर व्यापारी संघाची धुरा गेली अनेक वर्षे सक्षमपणे सांभाळल्याबद्दल प्रमोद ओरसकर व उमेश नेरुरकर यांचा जिल्हा व्यापारी संघातर्फे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, अरविंद नेवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मालवण व्यापारी संघाची पंचवार्षिक निवडणूक ६ ते २३ मार्च या कालावधीत होणार असून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद नेवाळकर यांची निवड यावेळी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पुढील वर्षी मालवणात होणारा जिल्हा व्यापारी मेळावा हा मालवण व्यापाऱ्यांच्या परंपरेनुसार भव्य दिव्य असच होईल असा विश्वास व्यक्त केला. विजय केनवडेकर यांनी सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योग मंत्रालयाच्या योजनाबाबत माहिती दिली तर मुकेश बावकर यांनी सर्व्हिस टॅक्स बाबत मार्गदर्शन केले. स्वागत उमेश नेरुरकर यांनी केले, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन गणेश प्रभुलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा