कणकवली
तालुक्यातील महामार्गालगत साकेडी अंडरपास येथील सर्व्हिस रस्ता डांबरीकरणाचे काम शनिवारी दुपारी स्थानिकांनी रोखले. ठेेकेदाराच्या चुकीच्या कामाचा त्रास आम्हाला सहन करावा लागणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान महामार्ग उपअभियंता अतुल शिवनीवार यांनी घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती समजून घेतली आणि दोन दिवसांत चुकीचे गटाराचे बांधकाम तोडून तेथे नवीन काम करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले. तसेच चुकीच्या कामांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असल्याचेही स्पष्ट केले.
महामार्ग चौपदरीकरणानंतर गेली तीन वर्षे रखडलेले साकेडी सेवा रस्त्याचे काम गेले आठ दिवस सुरू आहे. यात गटार बांधकाम आणि इतर कामे झाल्यानंतर आजपासून डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्याला समीर पाटील, निकित मुरकर, उमेश परब आदी ग्रामस्थांनी हरकत घेतली आणि काम बंद पाडले.
साकेडी सर्व्हिस रस्ता करताना तीन फुट उंचीचे गटार बांधण्यात आले. मात्र त्या गटारात पाणी जाण्यासाठीचे होल हे एक ते दीड फुट उंचावर ठेवण्यात आले. त्यामुळे मुख्यरस्ता आणि सर्व्हीस रस्त्यावरून येणारे पाणी थेट स्थानिकांच्या घरात जाण्याचा किंवा सेवा रस्त्यावरच राहण्याचा धोका स्थानिकांनी व्यक्त केला. सेवा रस्ता बांधताना अनेक घरांच्या, कॉम्प्लेक्स ठिकाणी जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आलेला नाही. जेथे रस्ता ठेवण्यात आला तो दोन ते तीन फुट उंच आहे. तसेच सेवा रस्त्यावरच तीन फुटाचा डांबरीकरणाचा भराव टाकण्यात आला आहे.
त्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणारी वाहने त्यावरून आदळून अपघात होण्याचीही शक्यता आहे. सर्व्हीस रस्त्यावरील अडथळे हटविल्यानंतर तेथे खडीकरण न करता माती च्या भरावा वरच डांबर टाकून रस्ता करण्यात आला आहे. पावसात भरावाची बाजूची ही माती वाहून गेल्यानंतर रस्ताही वाहून जाणार असल्याचे मुद्दे स्थानिकांनी महामार्ग विभागाचे अभियंता अतुल शिवनीवार यांच्यापुढे मांडले. व हे मुद्दे क्लिअर होत नाहीत तो पर्यत काम करायचे नाही असा इशारा दिला. उपअभियंता म्हणून तुम्ही जनतेच्या मागणीची दखल घेता पण ठेकेदार सुशेगात असेल तर त्या त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
श्री.शिवनीवार यांनी गटाराचे उंच झालेले बांधकाम तोडून ते सर्व्हीस रस्त्याच्या लेव्हलवर ठेवा. सर्व्हीस रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे बांधण्यात यावेत, गटारांमधील व वरील माती तातडीने काढली जावी.
गटारावर स्लॅब नाही ती कामे प्राधान्याने करा, साकेडी कडे जाणाऱ्या दिशादर्शक फलकाना काँक्रीट करा, जेथील अडथळे हटविण्यात आले, त्या भागात पुन्हा खडीकरण करून डांबरीकरण करा असे निर्देश केसीसी बिल्डकॉन ठेकेदाराला दिले. तसेच या सर्व चुकीच्या कामांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर दिला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान चुकीच्या पद्धतीने झालेले काम हटवून दोन तीन दिवसांत नव्याने बांधकाम केले जाईल अशीही ग्वाही त्यांनी दिली.