स्वाभिमानी कामगार संघटनेच्या लढ्याला यश
महाराष्ट्र शासनाकडून लाड पागे समितीच्या शिफारशी सरसकट सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लागू
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटनेने आवाज उठवून हायकोर्टात जनहित याचिका करीत महाराष्ट्र शासनाचे चुकीच्या धोरणांबाबत लक्ष वेधले होते. शौचालय स्वच्छता,मलनि:सारण व्यवस्था, नाली-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधीत अशा सरसकट सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याने स्वाभिमानी कामगार संघटना या निर्णयाचे स्वागत करत आहे. याआधी फक्त अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन निर्णय अंमलात होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांना वारसा हक्क लाभ देताना ज्या अनियमतीता आढळून येत खरे वारसांवर जो अन्याय करण्यात आला होता त्या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना पारित करत सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश देत पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावरुन गैला वाहून नेण्याचे काम केले आहे, अशा सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीमध्ये प्राधान्य देण्यास मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सफाई कामगारांच्या वारसांना याचा लाभ मिळणार असून आयुष्यभर घाणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यामुळे दिलासा मिळाला आहे. वारसाहक्क प्रस्तावासंदर्भात काहीही अडचणी भासल्यास संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केलं आहे.