हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अनंतात विलीन….
साधारण अडीच वर्षांपूर्वीची घटना असेल सावंतवाडीचे सेवाव्रती स्व. रामभाऊ परुळेकर यांच्या निवासस्थानी शेजारी असलेल्या जिजाऊ मोफत वाचनालयात जात होतो आणि पलीकडील कठड्याकडून आवाज आला”ओ नेते इकडे या, धारधार आणि कणखर आवाज अर्थात होता “स्व.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख अनीलभाई परुळेकर यांचा, अर्थात ते कळसुलकरच्या निवृत्त शिक्षिका सौ. पद्मा फातर्पेकर यांचे बंधू आणि प्रा. विजय फातर्पेकर यांचे भावोजी म्हणून ओळख असली तरी नव्वदच्या दशकात स्व. डाॅ. जयवंत नाईक यांनी जेव्हा सेनाभाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडूक लढवलेली होती तेव्हा त्यांच्या बरोबर मी प्रचारात सक्रिय होतो. तेव्हाचे अनीलभाई अगदी जवळून अनुभवता आले. त्यांनी हाक मारल्यावर मी गेलो, आणि माझ्यावर जोरात ओरडले”तुमका वाडिचो नगरसेवक कोणी केलो, ह्यो बघा माझ्या कंपाउंडात कोणीतरी कचरो टाकलो.आज चार दिवस झाले. तुमचो लक्ष नाय”.. इ. इ. माझ्या लक्षात आलं कायतरी गडबड आहे. मी म्हणालो भाई, मी नगरसेवक बिगरसेवक काय नायं… पण संध्याकाळ पर्यंत तुमच्या कचऱ्याची वाट लावतो.. तातडीने नगरपालिकेत फोन करून त्यांचा विषय मार्गी लावला. सावंतवाडीत वास्तव्यास आल्यावर त्या़ंची आणि माझी पहिली भेट. अटलच्या कार्यालयात जात असताना मला पाहून पुन्हा हाक मारली.. ये पार्सेकरा जरा इकडे ये.. मी गेलो. मला म्हणाले “माझा ठरला, येत्या नगरपालिकेच्या निवडणूकीत तू उभो रवतलयं आणि मी तुझो प्रचार करतलयं”.. भाई मला त्या भानगडी नको. आताच्या राजकारणात तुमचं आमचं काहीचं काम राहिलं नाही… यावर सुमारे दिड तास भाईनी आपला राजकीय प्रवास माझ्या समोर मांडला. प्रचंड बुद्धिमत्ता, दांडगी स्मरणशक्ती, आध्यात्मिक अभ्यास, वाचनाची आवड हे सगळं त्यांच्या त्या प्रखर वाणीतून पावलोपावली मला जाणवतं होत. विशेष म्हणजे राजकारणावर बोलत असताना स्व. बाळासाहेब आणि स्व. अटलजी यांच्याबाबत आदराने बोलत होते. ते म्हणाले आता जो राजकीय पक्षांनी सत्तेचा बाजार मांडलो हां त्यांची या दोन महान नेत्यांची नांव घ्येवची पण लायकी नायं”.
मला घरातील पुस्तक दाखवली व म्हणाले “तुका वाचूची आसत तर हय बसानं वाचं. घराकं नेवैकं मेळाची नाय” मालवणी प्रथा, परंपरा आणि मालवणी भाषा यावर त्यांचे विशेष प्रेम. अर्थात स्व. भाऊसाहेब परुळेकरांच्या सर्वच सारस्वत कुटुंबियांना बौद्धिक संपदेचे जन्मजात वरदान.
सावंतवाडीचा इतिहास सनावलीसह तोंडपाठ. त्यानी दोन पुस्तके लिहायला घेतली होती. मला म्हणाले’ मी असा ऐकलयं,तू कार्यक्रमाचं नियोजन छान करतयं,माझ्या पुस्तक प्रकाशनाचो कार्यक्रम तू ठरवचो हां”.. पण दुर्दैवाने त्यांची अगोदरच एक्झिट झाली.
शिवसेनेची लागलेली वाताहत त्यांच्या फार जिव्हारी लागली. कोकण लाईव्हची मुलाखत आमचे मिञ गावस यांनी घेतली तेव्हा त्यांना सेनेच्या फुटाफुटीवर बोलताना भावना अनावर झाल्या होत्या. कौटुंबिक माहिती देताना ते आपल्या नातवाचं फार कौतुक करायचे. सुदैवाने मुलगी व नातू यांचा त्याना शेवटचे दोन दिवस सहवास लाभला.
सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर ते ठरलेल्या जागी जेष्ठ नागरिकांसोबत नेहमी बसतं. त्या दिशेने माझं अनेकदा जाणं व्हायचं. त्यांना पाहून गाडी थांबवून त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी कधीच पुढे गेलो नाही.. आज त्या मोती तलावाचा कट्टा ही सुन्न झाला.
स्व. बाळासाहेबांनी सुरुवातीच्या काळात अनीलभाई सारख्या शिलेदारांना घेऊन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना रुजवली, वाढवली. गेल्या सुमारे तीस वर्षात झालेले राजकीय परिवर्तन आणि सत्तेचा जीवघेणा खेळ यामुळे शिवसेनेचे अनीलभाई सारखे पायाखालचे दगड बाजूला फेकले गेले. अर्थात सर्वसाधारण पणे सगळ्याचं राजकीय पक्षात आज हीच परिस्थिती आहे. होय, शिवसेना बाळासाहेबांचीचं आहे आणि ती सदैव राहिल पण अनीलभाई सारखे कट्टर शिवसैनिक आज दुर्मिळ झालेत.
फेब्रुवारीच्या २० तारखेला सारस्वत बँकने वेंगुर्ला येथे स्व. देवानंदवर आधारित त्यांच्या चित्रपटातील गांण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्याला मलाही निमंत्रित केलं होतं. आम्ही सावंतवाडीहून साधारण पंधराजण टेंपो ट्रॅव्हरलने गेलो होतो त्यात आदरणीय अनीलभाई होते. विशेष म्हणजे त्यांच्या भगिनी सौ. फातर्पेकर व त्यांचे भावोजी फातर्पेकर सरपण होते. जाताना आम्ही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर ते मोती तलावाच्या काठावर मला एकदाच भेटले. ही शेवटची भेट. त्याना खूप काही करायचं होत. जसं ते माझ्याशी बोलायचे तसेच ते सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, प्रा. रुपेश पाटील यांच्या बरोबरही भविष्यातील समाजपयोगी उपक्रमा बाबत चर्चा करत. हल्लीचं निरवडे येथील एका आधार नसलेल्या गरीब कुटुंबाची उपासमार होत होती हे जेव्हा त्याना समजलं तेव्हा त्यांनी प्रा. रूपेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल दहा हजार रूपयाचा शिधा स्वतः जावून दिला.
अनीलभाईंची सामाजिक कामाची अनेक अंग आहेत. सुदैवाने मी त्यांच्याशी जोडला गेलो होतो. या दोन दिवसांत मला मार्गदर्शन करणारे आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे दोन जेष्ठ महानुभाव मी गमावले. स्व. डि. के. सावंत आणि स्व. अनीलभाई परुळेकर.
समाजासाठी रचनात्मक काम करणाऱ्या अशा सेवाभावींची एक्झिट ही वैयक्तिक माझ्यासाठी वेदनामय आहेच पण समाजाचं नुकसान करणारीही आहे.
अनीलभाई विनम्र अभिवादन….
… ऍड. नकुल पार्सेकर..