सावंतवाडी :
सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करून एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान करण्यात आला आहे याची गंभीर दखल कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतने घेतली सावंतवाडीच्यावतीनं तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आज शुक्रवारी तात्काळ सावंतवाडी चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे ,ॲड नकुल पार्सेकर , दीपक पटेकर ,रुपेश पाटील ,विनायक गांवस ,श्री कुडतरकर आदी उपस्थित होते. यावेळी सदरचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहता ही घटना अत्यंत गंभीर आहे निश्चितपणे सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिले तर पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी या घटनेची सायबर क्राईम द्वारे सखोल चौकशी करून संबंधिताला गजाआड केले जाईल असे आश्वासन दिले.