You are currently viewing मोती तलावाचा काठ झाला सुना

मोती तलावाचा काठ झाला सुना

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा वाघ…एक कडवट कट्टर शिवसैनिक अनिल परुळेकर अनंतात विलिन*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणणारे, रुजवणारे, “बाळासाहेबांचा वाघ” अशी ओळख असणारे एक कट्टर शिवसैनिक अनिल परुळेकर हे काल ८५ व्या वर्षी अनंतात विलिन झाले. निष्ठावान शिवसैनिक कसा असावा…हे अनिल परुळेकर यांच्याकडे पाहिले असता लक्षात येत होते. बाळासाहेबांवर असलेली निष्ठा आणि पक्षावरचे प्रेम त्यांच्या शब्दाशब्दातून पाझरत होते. शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाकडे गेले तेव्हा व्यथित झालेले अनिल परुळेकर कित्येकांनी पाहिले. “तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना सांभाळण्यास लायक नाहीत” असे भावूक उद्गार काढून त्यांनी मनातील दुःख, सल व्यक्त केली होती. वयाच्या ८५ व्या वर्षी देखील शिवसेनेसाठी तलवार घेऊन संघर्षासाठी रणांगणात उतरण्याची तयारी असणाऱ्या कडव्या शिवसैनिकाला संवाद मीडियाचा मानाचा मुजरा…!

अनिल परुळेकर हे स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्गात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी त्यांच्यावरच सोपवली होती. सावंतवाडीतील माठेवाडा येथे असलेल्या त्यांच्या वाड्यात त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उतरले, वास्तव्य केले होते. प्रबोधनकार ठाकरे, शरद पवार यांनी देखील त्यांच्या वाड्यात वास्तव्य केल्याच्या आठवणी जुन्या काळातील कॅमेराबद्ध केलेल्या कृष्णधवल चित्रांमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत. आजही त्या आठवणी पाहून त्यांचा खणखणीत असलेला आवाज धीरगंभीर होतो. राज्यात शिवसेनेचे तुकडे होताना त्यांना पहावत नव्हते. शिवसेनेच्या विभागणीवर डरकाळी फोडणारा त्यांचा आवाज शांत होताच डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत असायचा. शिवसेना त्यांनी इतरांसारखी डोक्यात, कुठल्याही पदांच्या स्वार्थात नव्हे तर उरात, हृदयात खोलवर जपली होती, जतन केली होती. त्यांच्या डोळ्यांच्या पापणकडा चिंब भिजून गेल्यावर एका कडवट, निष्ठावान शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नाते किती दृढ असते याचा प्रत्यय येतो.

“आमचं लग्न बाळासाहेबांनी लावून दिलं” असं सांगताना बाळासाहेबांसोबत असलेला त्यांचा आणि पत्नीचा लग्नातील फोटो पाहून “बाळासाहेबांचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम शब्द होता…” असे म्हणत ते भावूक व्हायचे… शिवसेना वाढविण्यासाठी बाळासाहेबांसोबत गावोगाव फिरले… बाळासाहेबांनी शिवसेना वाढवताना साक्षीदार बनले… रक्ताचे पाणी करून बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना कदाचित तुटताना त्यांना पहावलं नसेल…. अन् त्यांनी तुटलेल्या शिवसेनेचा साक्षीदार होण्यापेक्षा परमेश्वराचे आमंत्रण स्विकारलं… ते स्वर्गवासी झाले…!

संघर्ष करायला घाबरायचं नाही… वाघासारखं भिडायचं… मर्दासारखे भिडा, सत्य कधीही पराभूत होत नाही…! असे उद्गार त्यांच्या तोंडून निघायचे तेव्हा खुद्द बाळासाहेबच बोलत असल्याचा भास व्हायचा, एवढी कणखर आणि निर्भिड त्यांची वाणी होती. कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी आयोजित “आठवणीतील सावंतवाडी” या कार्यक्रमात स्वतः हिरहिरीने भाग घेत त्यांनी जुन्या सावंतवाडीच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या. वेळेचे आणि सामाजिक परिस्थितीचे भान ठेऊन त्यांचा राबता असायचा. सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर लहान थोर सवंगड्यांसमावेत नित्याने त्यांची संध्याकाळ रमणीय व्हायची. ही.हा.शिवरामराजे भोसले पुतळ्या जवळील काठावर दररोज त्यांच्या मित्रमंडळी सोबत गप्पांचा फड रंगायचा, अनेक जुन्या घटना आणि नव्या घडामोडींचा परामर्श व्हायचा. सर्व मित्र मंडळींचे ते “आबा” होते. आज त्यांच्या गप्पागोष्टी मध्ये रमणारा मोती तलावाचा काठ मात्र मुका झालेला असेल सुना पडलेला दिसेल…कदाचित बहिराही होईल…त्यांच्या गप्पा आज त्याला ऐकू येणार नाहीत…अन् दृष्टी असूनही आंधळा होईल …कारण आबा तिथेच असतील पण काठाच्या अन् मित्र मंडळींच्या ते निदर्शनास येणार नाहीत. गेली काही वर्षे राजकारणापासून दूर असले तरी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आबा…श्री. काडसिद्धेश्वर अध्यात्म केंद्राच्या आध्यात्मिक कार्यातही अलीकडे रमताना दिसत होते… असे राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक कार्यक्षेत्रात उठावदार कामगिरीच्या जोरावर आपले नाव सावंतवाडी वासियांच्या मनात कायमचेच कोरून ठेवणारे आबा म्हणजेच अनिल परुळेकर आज आपल्यातून निघून जात अनंतात विलिन झाले.

नक्कीच भावी पिढीला राजकारणाची कास धरून समाजकारण करणारा नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण समोर ठेऊन जाणाऱ्या आबांचं मार्गदर्शन व सहवास कायम प्रेरणा अन् ऊर्जा देत राहील.

 

*जरी तुम्ही नसला तरी*

*सायंकाळी आठवण येईल…*

*मावळतीचा सूर्य नरेंद्रावरून*

*तुम्ही असल्याची साक्ष देईल…*

 

संवाद मिडियाकडून अनिल परुळेकर यांना भावपूर्ण आदरांजली..🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =