You are currently viewing काजू दर दोन रुपये चढ्या दराने खरेदी करणार

काजू दर दोन रुपये चढ्या दराने खरेदी करणार

शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांची माहिती

बांदा

शासनाच्या उदासीतेचा फटका काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रामुख्याने बसत आहे. कारखानदार व शेतकरी यांच्यात सरळ व्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळणे आवश्यक असताना कारखानदारच व्यापाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठे करीत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या दीडपट हमीभाव हे पंतप्रधानांचे वचन हवेतच विरले आहे. एकंदरीत कारखानदार व व्यापारी यांच्यात साठेलोटे सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी आम्ही बाजारपेठेतील काजू दरापेक्षा दोन रुपये जास्त दराने काजू खरेदी करणार असल्याचे माहिती सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनी लिमिटेड व शेतकरी फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघाचे पदाधिकारी विठ्ठल मोरुडकर, जनार्दन नाईक उपस्थित होते.
श्री.सावंत म्हणाले की, जी.आय. मानांकन मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बी ची व्यापारी व कारखानदारांकडून अवहेलना होत आहे. त्यामुळे जीआय म्हणून सिंधुदुर्ग काजूगर घेणाऱ्या लाखो ग्राहकांची कारखानदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप श्री. सावंत यांनी केला. गोव्यामध्ये अजूनही उत्पादित होणारी काजू बी ही 80 टक्के अधिक गावठी असते व मोजमाप मात्र 180 200 रुपये काजू बी किलो असते.
गत चार-पाच वर्षात 140 ते 180 पर्यंत काजू बि दर होऊनही काजूगरांचा दर मात्र स्थिरच होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कमी दरात घेऊन प्रचंड नफा कमविण्याकडे व्यापारी कारखानदारांचा कौल आहे. काजू उत्पादन खर्च १२२ रुपये प्रति किलो असताना त्यावर किमान 15 ते 20 रुपये ज्यादा मिळून हा दर 140 रुपयांच्या आसपास असल्यास शेतकऱ्यांना परवडेल, तरीही दर कमी करण्याचा डाव व्यापारी व कारखानदारांकडून केला जातो. अनेक कारखानदारांकडून अथवा एक्स्पोर्टकडून हा काजूगर परकीय देशात दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति किलो दराने खपवून प्रचंड नफा कमवला जातो यात मात्र शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले जाते.

दरम्यान, एकंदरीत पाहिल्यास अनेक तरुण शेतकऱ्यांनी अशा कारणांमुळे इतर पिक उत्पादनाकडे आपला कल वाढवला असून भवितव्यात काजू पीक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका मात्र कारखानदारांना नक्कीच बसणार. शासनाने आपली उदासीनता बाजूला ठेवत पंतप्रधानांच्या ‘उत्पादनाच्या दीडपट हमीभाव’ या वचनाला जागावे असे आवाहन विलास सावंत यांनी केले.

बाजारपेठेत जेवढा दर असेल त्याच्यापेक्षा दोन रुपये अधिक दर शेतकरी फळबागायतदार संघाकडून शेतकऱ्यांना देणार. व्यापारी व कारखानदारांमध्ये सुरू असलेले साठेलोटे बंद झाल्यास काजू बागायतदार शेतकऱ्यांना 150 ते 160 रुपये दर मिळणे अपेक्षित असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा