You are currently viewing कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

*कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय*

*३२ वर्षांनी इतिहास घडला*

*काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ११,००० हजार मतांनी विजयी*

*कसबा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ तरीही भाजपचा पराभव*

*भाजपच्या हेमंत रासनेंच्या जिव्हारी लागला पराभव*

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले रवींद्र धंगेकर यांना ११,००० मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे.

२०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपला बालेकिल्यातला पराभव जिव्हारी लागला आहे. ३२ वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला हातून निसटला आहे.

कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

*”हू इज धंगेकर?” म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला*

भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार्‍या कसबा मतदारसंघांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे हे पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक काळात त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना “हू इज धंगेकर?” असे संबोधले होते. त्याच कसब्यातील जनतेने नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर असा शिक्का मारून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोठी चपराक दिली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदार संघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर फुटले आहे.

*रवींद्र धंगेकर कोण आहेत ?*

रवींद्र धंगेकर मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत रंगली होती. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या धंगेकरांनी रासनेंना एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही.

महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही कॉँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही.

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा नाशिकच्या काँग्रेस कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

*धंगेकरांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार*

नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २३ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान केलेल्या भाषणात फडणवीस यांनी स्पष्टपणे हिंदुत्वाचा उल्लेख करून मतदारांना ‘हिंदुत्वाला मत द्या’ असे सांगितले होते. धर्माचा प्रचारात वापर करून समाजात तेढ निर्माण केली, असा आरोप धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केला, असे रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी केलेल्या पत्रात केला आहे. निवडणूक आयोग यावर कोणती कारवाई करणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा