महेंद्र मातोंडकर यांचे प्रतिपादन : तळवडेतील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
तळवडे /सावंतवाडी:
मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आणि ज्यांनी मराठी भाषेला नवी ओळख देण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्या थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तळवडेतील गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबविते ही कौतुकास्पद बाब आहे. आजच्या तंत्रयुगात स्वतःला जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजी आवश्यकच आहे. मात्र, संस्कृती आणि संस्कारांची जोपासना करण्यासाठी मातृभाषेशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यानी संस्कृती रक्षणासाठी मातृभाषेचा गजर करायलाच हवा, असे प्रतिपादन शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तथा पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी तळवडे येथे केले.
तळवडे (ता – सावंतवाडी) येथील इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे या स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक अजय बांदेकर, मराठी विषयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम. पालकर , श्रीम. देसाई, श्रीम. तांबे, श्रीम. माणगावकर, श्रीम. रेडकर, श्रीम. मयेकर, श्रीम. आसोलकर, श्रीम. पायनाईक, वसंत सोनुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर श्री. मातोंडकर व शाळेचे मुख्याध्यापक बांदेकर यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर खास मराठी दिन कार्क्रमासाठी मुलांनी तयार केलेल्या शुभेच्छा संदेश कार्डच्या प्रदर्शनाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षिका अंकिता पालकर यांनी प्रास्ताविक केले. वेदांत पाटकर (पाचवी), तन्मय दळवी (आठवी), क्रिस्टेन गोन्साल्विस (सातवी) या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाविषयी भाषण केले. जतीन पाटील, पार्थ सावंत भोसले, अन्वी गावडे व मानवी म्हारव या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणारा पोवाडा सादर केला. आराध्या तळवणेकर हिने कथा सादरीकरण, प्रेरणा काजरेकर हिने मनाचे श्लोक, ब्लूमिंग बर्ड्स प्री प्रायमरी स्कूलच्या के.जी.च्या चिमुकल्यानी बडबड गीत व किलबिल गीत सादर केले.
मराठी भाषेचे विविध कांगोरे प्रदर्षित करणाऱ्या मुलांच्या विविध गुणदर्शनानंतर मुख्याध्यापक अजय बांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या संचालिका श्रीमती मैथिली मनोज नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांनी केले, तर शेवटी शिक्षिका स्वप्नाली तांबे यांनी आभार मानले.