*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री उल्का कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*माय मराठीची थोरवी*
माझ्या मराठीचे बोल कौतुके
अमृतातेही पैजा जिंके.
माय मराठीची थोरवी, संत ज्ञानेश्वर या शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये व्यक्त करतात. जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि उत्कट अशा भक्तीचा भावार्थ स्पष्ट केला. प्रपंचात राहून परमार्थ साधणे, सतत नामस्मरण, भक्तीची ओढ त्यांनी अगदी सहजपणे स्पष्ट केली. अध्यात्माचा मार्ग अगदी सहज सोपा करून सांगितला. तेव्हाच जनसामान्यांना ती आपल्या जवळची वाटली आणि तेव्हाच त्यांनी हे गौरव उद्गार मराठी भाषेबद्दल काढले.
महाराष्ट्र संतांची भूमी, तसेच अनेक मराठमोळ्या संस्कृतीने नटलेली. दमदार असा मराठी बाणा, पूर्ण जगतात गाजला. मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य, याच मातीत घडले. युगानुयुगे आणि शतकानुशतके, मराठ्यांच्या इतिहासांनी अजरामर करून ठेवले. ” हर हर महादेव,” हे मराठी शब्द मोगलांच्या काळजाचा ठाव घेणारे. झोपेतही या शब्दांची जरब वाटावी असे.त्यामुळेच मराठी बाणा म्हटले की, अनेक संस्कृती आदर्श डोळ्यासमोरून तरळून जातात. माय मराठीची महती कोणत्या शब्दात वर्णन करावी? अभिमानाने छाती फुलुन यावी, अस तीच सौंदर्य, कणाकणात नटलेलं. अनेक उपमाही तिला कमी पडाव्या. अगणित अशा अलंकाराने, नटून ती अजूनच देखणी अशी झालेली. प्रत्येक साहित्यिकांच्या नजरेतून तिचं सौंदर्य वेगळं. कधी कुणाला ती ओघवती वाटते, तर कधी अलंकाराने सजलेल्या नववधू सारखी, कधी कोणाला ती क्लिष्ट वाटली, तर कधी कुणाला ती गुढ वाटते. काना, मात्रा उकार, वेलांटी, विसर्ग हे तिचे अलंकार जरा जरी आदलाबदली झाले तरी, अर्थाचा अनर्थ होईल अशी धोकादायक वाटली. तर कधी परिस्थितीनुसार, शब्दांचा अर्थ बदलणारी वाटली.कधी भावना स्पष्ट करणारी तर कधी भावना लपवणारी वाटली. एकटी तर ती कधीच आली नाही. बरोबर कायमच अलंकारांचा लवाजमा सजलेला. किती म्हणून तिच्या गुणांचे कौतुक करावे?
तिला उपमाच एका आईची दिलेली आहे. एका आईची थोरवी आपण कोणत्या शब्दात वर्णन करणार? ही माय मराठी, कधी गोड शब्दातून व्यक्त झाली, तर कधी तिखट शब्दातून. कधी मायेचे पांघरून घातले तर कधी कडक झाली. एखादी वीज कोसळून पडावी असा हिचा लखलखाट, हिच्या तेजाने अवघ शब्द विश्व प्रभावित झालेलं.या मराठी मातीत जन्मलेल्या, साहित्यिकांच शब्दभांडार, अगदी विपुल आणि संपन्न असलेलं, ज्यातून माय मराठीचा अभिमान अगदी ओसंडून व्हावा असं. कधी तिच्या शब्दातून रणांगण अवतरलं, तर कधी प्रेमभावना स्पष्ट झाली.तिच्या सोबतीला उपमा ,अलंकार वृत्त, यामुळे तर ती वेगळ्याच ढंगात नटून गेली.
माय मराठीची थोरवी गाताना, अनेक साहित्यप्रकारही सजले. कथा, कादंबऱ्या ,ललित लेखन स्फुट लेखन, अलक लेखन अगणित अशा काव्य प्रकारात, बाणाक्षरी ,शेल काव्य, द्रोण काव्य, दीप काव्य यांनीही ठसा उमटवला. आणि प्रत्येक कवीच्या स्वतंत्र शैलीची ही ओळख बनली. अनेक नियम , अनेक प्रकार याने हा साहित्याचा मराठी बाणा, दुमदुमत राहिला. लवचिक तरी किती, सहजपणे वाकवता येणारी, मग ते माध्यम दोन ओळीतले यमक असेल, काव्य कस्तूरी प्रकार असेल, किंवा काव्य सुरभी किंवा मुक्तछंद असेल. कोणत्याही प्रकारात सौंदर्य वाढणारच. जेवढी बोलायला सोपी, तेवढीच समजायला अवघड. विचार करता करता, शब्दांची संपूर्ण भावस्थिती उलगडण्याचं सामर्थ्य हिचं. हिच्या सहवासात, मनातील असंख्य विचारांना, वेगवेगळे पैलू पडणार. आणि शब्दाचा मूळ भावार्थ, लक्षात येणार.
माय म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, कोणत्या भाषेत एवढी ताकद आहे हो, प्रत्यक्ष ईश्वर आणि आत्म्याला एकत्र आणण्याची. समृद्ध, संपन्न असा जीवनाला आकार देणारी ही मराठी माय समजून घेऊ तेवढी गूढ वाटते. “जे न देखे रवि ते देखे कवि”, असे म्हटले जाते. परंतु त्याही पलीकडे जाऊन ही मराठी भाषा पोहोचली आहे. “आम्हा धने शब्दांचीच घरे” असे जगद्गुरु तुकाराम महाराज ही सांगून गेले. “दिसामाजी काहीतरी लिहावे आणि वाचावे, या समर्थांच्या वचनांनी” तर तिचा एक अलौकिक साज सजला. महाराष्ट्राची अध्यात्मिक विपुल ग्रंथसंपदा, या मराठीच्या आविष्काराने सजली. युगानुयुगे निरंतर जनसामान्यांना प्रभावित करत राहिली. मग त्यात रोजचे असे मनाचे श्लोक असतील अथवा गणपती स्तोत्र असेल, किंवा देवा विषयीची आळवणी असेल, किंवा करूनाष्टके असतील ती यातूनच प्रतीत होते.
सप्तसूर सा रे ग म प ध नी सा चे, या माय मराठीचे संपूर्ण गायन क्षेत्रात गाजले. अगदी हृदयाच्या जवळ, वाटणाऱ्या या शब्द विलासात , अनेक धर्म, प्रांत, जाती रंगून गेल्या. तमिळ, मल्याळी ,इंग्रजी ,पंजाबी ओडिसी अशा अनेक परप्रांतीयांना हे सूर जवळचे वाटले.
अनेक ताल सूर लय, यातून तर तिचं विश्व अजूनच वलयांकित झालं.
अशा या माय मराठीची थोरवी गाताना कविवर्य कुसुमाग्रज सांगून जातात, ज्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी धडपड केली.
“माझ्या मराठी भाषेचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा”
सौ उल्का कुलकर्णी ✍️ नाशिक