You are currently viewing खरे विद्यापीठ…!

खरे विद्यापीठ…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*खरे विद्यापीठ…!*

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट
माय मराठीच आहे खरे आम्हा विद्यापीठ
पांग फेडण्यास सज्ज लेकरेच तिची सारी
आहे अमृताचीवाणी तिच आम्हास हो प्यारी…

तुकारामांनी जपली वाढविली ज्ञानदेवे
एकनाथी भागवत दासबोध आम्हा हवे
संत पंत शाहिरांनी खूप तिला नावाजली
सागराहूनही आहे खोल खोल तिची खोली …

किती झाले लेखक नि कवी तिला पुजियली
ज्ञानपीठ गौरविते दिगंतरा माय गेली
“आ चंद्र सूर्य नांदो” गर्जतील दिशा दाही
वर्णण्यास महिमा हो सागरही पुरे नाही…

गझलेत कीर्तनात कवितेत सदा दंग
माय मराठीचा माझा आहे वेगळाच ढंग
अमृताहुनीहो गोड बोल तिचेच झेलतो
आवर्जुन आम्ही सारे मराठीतच बोलतो…

अभिमान ध्यानी मनी आहे सदैवच तिचा
मराठीचा भक्त कुणी नाही बरं लेचापेचा
फुलो फळो वाढो तिची शान सदा भविष्यात
बसणार आम्ही सदा तिचे गोडवेच गात …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २१ /२/२०२३
वेळ : संध्या: ६/३७

प्रतिक्रिया व्यक्त करा