अतिक्रमण करून उभारलेल्या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाला तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांची उपस्थिती*
*सरपंचाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; सत्पाळा गावातील प्रकार*
विरार (गुरुदत्त वाकदेकर) :
आजपर्यंत भूमाफीयांद्वारा शासकीय जागा हडपल्याचे ऐकिवात होते. परंतु आता चक्क महसूल विभागानेच ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पश्चिम पट्ट्यातील सत्पाळा गावात सदरचा प्रकार घडला असून या ठिकाणी कोणतीही रीतसर निविदा प्रक्रिया तथा ठराव मंजूर न करता ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून तलाठी कार्यालय उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबत सत्पाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता भंडार यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवून हरकत नोंदवली होती. परंतु काल या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाला तहसीलदार, प्रांताधिकारी स्वतः उपस्थित राहिल्याने शासकीय अधिकारीच भूमाफीये झाले की काय? असा प्रश्न वसईकरांकडून विचारला जात आहे.
मौजे सत्पाळा सर्वे नं १९२ या जागेची मालकी सत्पाळा ग्रामपंचायतीकडे आहे. सदरच्या जागेवर व्यायामशाळा बांधण्याचे ग्रामपंचायतीचे प्रयोजन होते. परंतु त्याआधीच त्याठिकाणी महसूल विभागाने तलाठी कार्यालय उभारले आहे. त्यामुळे नागरिकांना कायदा दाखवणाऱ्या महसूल प्रशासनाने मनमानी पद्धतीने रितसर ठराव तथा निविदा प्रक्रिया न राबवता तलाठी कार्यालय उभारल्याने संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे हे तलाठी कार्यालय उभारण्यासाठी विद्यमान तलाठी चंद्रकांत पाटील यांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. तसेच सदर तलाठी कार्यालय लोकवर्गणीतून बांधल्याचे सांगत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील हे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या वटार, सत्पाळा, कोफराड, राजोडी या महसुली गावात अनेक शासकीय जागांवर अतिक्रमणे झाली असून त्याठिकाणी शेकडो रिसॉर्ट उभे राहिले आहेत. या अतिक्रमित झालेल्या जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात घेऊन त्यातील एखाद्या जागेची तलाठी कार्यालय उभारण्यासाठी मागणी करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता ग्रामपंचायतीने आधीच व्यायामशाळेसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर सरपंचाचा विरोध असतानाही त्याठिकाणी तलाठी कार्यालय उभारत आपण कार्यतत्पर तलाठी असल्याचा भास निर्माण केला. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.
वटार, सत्पाळा, कोफराड, राजोडी या महसुली गावांसाठी असलेल्या तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाल्याने सध्या भाड्याच्या जागेत तलाठी कार्यालय सुरू आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तलाठी कार्यालयाची आवश्यकता होती. त्यासाठी नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त होते. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या जागेवर तलाठी कार्यालय उभारण्यास घेतले ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. त्यास सरपंच संगीता भंडार यांनी हरकत नोंदवत विरोध दर्शविला होता. तसेच मनमानी पद्धतीने जागा हडप करणाऱ्या तलाठी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. परंतु आता खुद्द तहसीलदार, प्रांताधिकारी उद्घाटनाला उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.