*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोडे*
आज मला ते दिन आठवती सोनेरी वर्खाचे होते
असे कसे ते गोड गोड हो प्रिय व्यक्तींशी असते नाते..
जग तेच हो विश्व तेच हो धुंद हवा भवताली होती
विसरण्यास हो भाग पाडते एक अनोखे गोड ते नाते…
सर्वांगाला लपेटून हो विचार एकच ध्यानी मनी तो
धुन एकच एकच गहिरी लकेर पोपट हिरवा गातो…
धुके धुके ते सर्वांगाला नजर भिरभिरी नयना मधली
मनात ठरेना दुसरे कोणी गाल गुलाबी लाली लाली…
समर्पण ते त्या टोकाचे नवलाई ती आज वाटते
तरूणपणाच्या उंबरठ्यावर सर्वांचे का असेच होते?…
ओढ कशाची? प्रेमाची का? नसानसातून तेच वाहते
मग उतरती कळा लागते गहिरे प्रेम ते कुठे हो जाते?..
चुंबक जाती दोन दिशांना वाताहत ती करूनी घेती
परिस स्पर्श तो प्रेमाचा हो का हो त्याची होते माती?…
भरडून निघते अवघे जीवन लक्तरेच ती मग वेशीला
रक्तबंबाळ त्या हृदयांना,अर्थ ना जीवन, ना काशीला…
कोडे जीवन कोडे माणूस थांग तयाचा कधी न लागला
प्रेमाचा तो असून भुकेला शेवटी भिकेला का तो लागला…?
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३१ जानेवारी २०२३
वेळ : ४/३५