You are currently viewing पुन्हा घडावे शिवराज्य………..

पुन्हा घडावे शिवराज्य………..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*

*पुन्हा घडावे शिवराज्य…………..*

|| आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम…..
महाराज, गडपती, भूपती, प्रजापती,
सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत,
अष्टप्रधान वेष्ठीत, न्यायलंकर मंडीत
शस्त्रास्त्रशस्त्र पारंगत, राजनीतीधुरंधर,
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ||

असं चार चौघात नारा दिला, जयजयकार केला, आणि डी जे वर थोड नाचलं, भगवे झेंडे फिरवले की झाली आमची शिवजयंती. “राजे, बघा….बघा तुम्हीच”, ही आजची तरुणाई. ज्या हातात तलवारी घेऊन नाचतात, मित्रांच्या वाढदिवसाचे केक तलवारीने कापून वाढदिवस साजरा करतात, नंतर तेच हात आया बहिणींच्या अंगावर टाकून छेड काढली जाते. राजे, तुम्ही एवढ्या मोठ्या कष्टाने हे हिंदवी स्वराज्य उभे केले, समस्त जनतेला विशेष करून स्त्रियांना मुघलांवरील अत्याचारापासून दिलासा दिला, आज त्याच स्त्रियांसाठी जगणं कठीण होऊन बसले आहे. राजे, तुम्ही हिंदवी स्वराज्य स्थापनेपूर्वी परस्त्रीच्या अंगावर हात टाकणे, स्त्रीचा अमानुष छळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे सांगून देखील आजची तरुणाई तीच घोड चूक पुन्हा करत आहे.

“शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कोणाची भीती”

राजे, या ओळीचा चुकीचा अर्थ या ठिकाणी घेतला जातो, आणि खरेच आजच्या जाणत्या तरुणाईला कोणत्याही कायद्याचे अथवा कोणाचेही भय राहिलेले नाही. एव्हढेच नव्हे राजे, एव्हढेच नव्हे, सध्याच्या घडीला वेगळाच प्रकार ठिकठिकाणी बघावयास मिळत आहे. आधी प्रेम करायचं आणि नंतर त्याचाच भंग करायचा. म्हणजे याचा अर्थ प्रेमाला ही किंमत नाही ठेवली या भेकड अवलादांनी. शिवाय यातील ६०% आपलेच मावळे आहेत. मग प्रश्न हा उरतो मुलींनी आपल्या जोडीदारावर प्रेम करून, त्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवून, त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर आपले स्वतःचे घर त्यागून, आता आपला जोडीदार हाच आपले सर्वस्व मानणे हा त्यांचा गुन्हा आहे? की मुलींनी प्रेम करणे हाच मोठा गुन्हा आहे?
मागच्या दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट, दिल्लीत श्रद्धा नावाच्या मुलीने अल्ताफ वर प्रेम असल्याकारणाने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने तिला मारले, शिवाय तिचा मृतदेह फ्रीजमध्ये काही दिवस ठेवला. एवढ्यावर न थांबता मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी या संबंधी माहिती मिळवण्यासाठी त्या प्रकारचे चित्रपट बघून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून रोज एक तुकडा जंगलात नेऊन टाकत असे. इतकी क्रूरता आली कुठून म्हणायची या आजकालच्या तरुणाई मध्ये?
याच पाठोपाठ दिल्लीतून दुसरी खबर मिळाली ती याच घटनेची पुनरावृत्ती. निक्की यादव मुलीचे नाव. साहिलचे या मुलीवर प्रेम असताना निव्वळ मुलगी मुस्लिम धर्म स्वीकारत नाही म्हणून दुसरे लग्न करून घरात आला. निक्की जीवाचा आकांत, आरडाओरड करत असल्याने याने ही निक्कीला कायमचे संपवले, व तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. निक्किने प्रेम केले होते. गुन्हा नव्हता केला की ज्याची एवढी मोठी किंमत त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला भोगावी लागली. या घटनेचे पडसाद राजस्थानमध्ये ही उमटतील असे स्वप्नात ही वाटले नव्हते.
आणि तसे घडले देखील, पुन्हा दोन दिवसांपूर्वी बातमी वाचण्यात आली राजस्थान मध्ये या घटनेची पुनरावृत्ती घडली. जीवापाड प्रेम करत असलेल्या मुलीने प्रियकराजवळ लग्नाचा तगादा लावला म्हणून त्या मुलीचा गळा चिरून, मृतदेहाचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात फेकून दिले. इतकी क्रूर मानसिकता हल्लीच्या तरुणांची असू शकते, डोळ्यावर आणि कानांवर ही विश्वास बसत नाही.
राजे, तुम्ही सांगा मुली प्रेम करतात आपल्या जोडीदारावर आणि फक्तं एक अपेक्षा असते प्रत्येक मुलीची की, आपल्या जोडीदाराने आपल्याला आयुष्यभर साथ द्यावी, यात गैर काय? त्या साध्या सरळ मुलींची एक अपेक्षा पूर्ण करू शकत नाही एवढे षंढ आहेत का आजचे तरुण? मग जर आपण लग्न करू शकत नाही त्या मुलीशी, त्यांची जबाबदारी आयुष्यभर घेऊ शकत नाही तर यांनी प्रेमाचे नाटक तरी का करावे?
या तरुणाई मधली काही तरुण मंडळी अशी पण आहेत की, स्वतःची शारीरिक गरज भागवण्यासाठी, मुलींशी प्रेमाचे नाटक करतात, परंतु त्यातून अर्भक उत्पन्न झाल्यास त्या मुलीवरची तसेच तिच्या होणाऱ्या बाळाची ही जबाबदारी झटकून देऊन मोकळे होतात. काय करावे मग अशा मुलींनी? घरी गेल्या तर घरचे स्वीकारणार नसतात आणि इकडे हे असे. काय अवस्था होत असेल त्या मुलीची? म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न निर्माण होतो अशा मुलींचा. पण पुरुषांच्या पौरुषत्वाला त्याचे कणभरही फरक पडत नाही. काय मिळते यांना मुलींची बदनामी करून, त्यांचे आयुष्य बरबाद करून?
बाकी इतर महिलांवरील अत्याचार तर थांबतच नाही आहेत. त्यात ही हत्याकांडची मालिकाच सुरू झाली आहे जणू.
राजे, आम्हाला माहिती आहे आज तुम्ही असते, तर त्या नराधमांचे लचके तोडून, दोन्ही हात मुळापासून उखडून टाकले असते किंवा त्यांना हत्तीच्या पायी तरी दिले असते. खरेच आज समाजातील ही दयनीय अवस्था पाहून तुम्ही आज हवे होते, हे शिवराज्य आज हवे होते असे वाटायला लागते.
एका बाजूला स्त्रीवर होणारे अनाठायी अत्याचार तर दुसरीकडे होते गायींची कत्तल. हा प्रकार ही अजून संपलेला नाही. फक्त याचे प्रमाण जरा कमी आहे. परंतु, तरीही कुठेतरी या समाजात ही समस्या देखील भेडसावत आहे. या सगळ्यामुळे समाजात सामाजिक विषमता प्रस्थापित होत चालली आहे, हे विसरून चालणार नाही.
राजे, इतर लोकांमध्ये वा काही लोकांमध्ये या विषयी चर्चा सुरू असताना बऱ्याचदा “हल्लीच्या जमान्यात मुली तोकडे कपडे वापरतात, महाराष्ट्राच्या संस्कृती नुसार, परंपरेनुसार मुलींचा पोशाख परिपूर्ण नसतो म्हणून हे विनयभंग, अत्याचार, बलात्कार, ॲसिड हल्ला असे विविध प्रकार घडत असतात. परंतु, मला वाटते जग आता बदलत चालले आहे नवनवीन फॅशन येत चालले आहे त्यानुसार मुली आपली राहणीमान बदलणारच ना. हे कधी कळणार लोकांना? त्यांचे म्हणणे, “अशा नराधमांची मुलींवर करडी नजर पडते म्हणून, तू असे कपडे घालायचे नाही, इकडे जायचं नाही, मित्रांमध्ये जायचं नाही, एकटे फिरायचे नाही”, ही अशा प्रकारची बंधने मुलींवर लादायची. म्हणजे राजे, हे तर मुलींकडून त्यांचे जिवीत स्वातंत्र्य काढून घेतल्यासारखे झाले. त्यापेक्षा हीच लोक आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीचा, मुलींचा, महिलांचा आदर आणि सन्मान करायला शिका. ही एक साधी शिकवण का नाही देऊ शकत? या समाजातील निष्पाप मुलींनी जन्मास येऊन अशी काय चूक केली की प्रत्येक वेळी त्यांनाच दोषी ठरवलं जातं आहे?
राजे, महाभारतात भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगताना कथित केले होते,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम् |
धर्मसंस्थापणाथाय संभवामी युगे युगे ||

म्हणजेच, जेव्हा जेव्हा या सृष्टीत, पृथ्वीवर अधर्माचा उद्रेक होईल, जेव्हा जेव्हा अधर्म शक्ती समाजात वास करेल तेव्हा तेव्हा परमेश्वर आपला एक अवतार घेऊन पृथ्वीवर धर्मरक्षणासाठी अवतरेल. आणि तो अवतार तुम्ही घेऊन आला होतात राजे. तुम्ही घेऊन आला होतात त्यामुळेच आज जे काही आम्ही आहोत ते तुमच्यामुळे आहोत. पण आता ही तीच वेळ पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे, राजे, तुम्ही स्वराज्याचा एक नियम सांगितला होता, की परस्त्रीला मातेसमान माना. त्यांचा आदर आणि सन्मान करा. पण स्त्रियांचा आदर सन्मान तर दूरची गोष्ट याउलट सततची करडी नजर या नराधमांची स्त्रियांकडे फिरत असते.


राजे, आज कवी, गायक त्यांच्या गाण्यात म्हणतात,”या देशाला जिजाऊंचा शिवबा पाहिजे” पण एक साधी सरळ मुलगी जिजाऊ घडण्याआधीच जर तिचे स्त्री अस्तित्व संपुष्टात येत असेल तर कशी घडणार जिजाऊ आणि कसा घडणार जिजाऊंचा शिवबा? खरेच, जिजाऊंचा शिवबा घडायला जिजाऊ घडणे काळाची गरज आहे. तसेच जिजाऊंचा शिवबा घडायला प्रत्येक घरातील माय आणि गोठ्यातील गाय जिवंत राहणे, तिचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे. व त्यासाठी हे शिवराज्य पुन्हा एकदा घडणे तितकेच अत्यावश्यक आहे.
तेव्हा राजे, आता तुम्हीच परमेश्वर रुपी अवतार घेऊन प्रकट व्हावे, नवे सुराज्य स्थापन करावे, व पुन्हा एकदा शिवराज्य घडवावे अशी समस्त रयतेची, मावळ्यांची आर्त आळवणी आहे. म्हणजे राजे तुम्ही असता तर…….हा विषय ही इथेच थांबेल.

लेखक : नयन धारणकर, नाशिक
8275838083

प्रतिक्रिया व्यक्त करा