कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ :
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’च्या एज डेटा सेंटरचा शुभारंभ आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पार पडला. भारतातील किंबहुना जगातील हे पहिले कंटेनर डाटा सेंटर याचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात कुडाळ-एमआयडीसी येथे करण्यात आले. या डेटा सेंटरमुळे गावे, छोटी शहरे जगाशी जोडली जातील. ‘हायड्रा कुडाळ’ या ब्रँड नावाने हे डेटा सेंटर ओळखले जाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ या प्रोजेक्ट खाली यामुळे स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळाली आहे. कुडाळसारख्या ग्रामीण भागामध्ये हे कंटेनर डाटा सेंटर देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. यावेळी व्हॅरेनियमचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर मुकुंदन राघवन, प्रोजेक्ट हेड विनायक जाधव आणि ऍडमिन संदीप नाटलेकर हे उपस्थित होते. चीफ फायनान्शिअल ऑफिसर मुकुंदन राघवन यांच्या हस्ते फीत कापून डाटा सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी मुकुंदन राघवन यांनी ‘हायड्रा कुडाळ’ या कंटेनर डाटा सेंटरची कार्यप्रणाली कशी असते ? डेटा सेंटरमधील मशीनरी, टेक्निकल कॉन्सेप्ट याबाबत मान्यवरांना माहिती दिली. व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड या भारतीय डिजिटल तंत्रज्ञान कंपनीने डिझाइन केलेले एज डेटा सेंटर गोव्यात तसेच सिंधुदुर्गातील कुडाळ येथे सुरु झाले आहे. हे केंद्र हायड्रा ब्रँड अंतर्गत सुरू केले जाणार आहे. लहान शहरे आणि विखुरलेल्या ठिकाणी सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे. हे एज डेटा सेंटर उपकरणांमधील परस्पर संबंध आणि डेटा सामायिकरणाची प्रक्रिया अखंडपणे बनविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे. यात वेळेचीही बचत होईल. या प्रणालींमधील माहितीनंतर एका मोठ्या डेटा सेंटरमध्ये एकत्रित केली जाते. ज्यामुळे केंद्रीकृत प्रक्रिया आणि एक विस्तृत संसाधन आधार मिळू शकण्यास मदत होणार आहे. याबाबत प्रोजेक्ट हेड विनायक जाधव म्हणाले की, आज ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’चे डेटा सेंटर कुडाळमध्ये सुरु झाल्याने ग्रामीण भागातील व्यावसायिकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ या प्रोजेक्टच्या अंतर्गत हे कंटेनर डाटा सेंटर असून यामुळे ग्रामीण भागातील छोटे-छोटे व्यावसायिक काम करण्याची संधी निर्माण झाल्या आहेत . याचा फायदा त्यांना होणार असून देशाच्या प्रगतीत हातभार लागेल. तर व्हॅरेनियमचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर मुकुंदन राघवन म्हणाले की, कुडाळसारख्या ग्रामीण विभागात हे डाटा सेंटर सुरू करून कंपनीने उत्तुंग भरारी घेतली आहे. आताच्या डाटा सेंटरमध्ये आणखी बदल करून याही पेक्षा अद्ययावत यंत्रणा निर्माण केली जाईल. या डाटा सेंटरमधून लहान शहरे आणि विखुरलेल्या ठिकाणी सेवा देणे हा कंपनीचा या मागील उद्देश आहे. आजकालच्या युगात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून लोकांना इंटरनेट आणि सर्व्हिस कोणताही विलंब न करता आवश्यक असते. आमची कंपनी लोकांना हीच सर्व्हिस २४ तास देणार आहे. आमच्या कंपनीकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असून यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायिकांबरोबर जोडता येणे सहज सुलभ होईल, असे मुकुंदन राघवन म्हणाले. तसेच येत्या काळात ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’ सिंधुदुर्गात आपला विस्तार करणार असून यामुळे स्थानिक युवक-युवतींना यामुळे रोजगार प्राप्त होईल.