*सहभागींमध्ये कमालीची उत्सुकता*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
रंगाविष्कार आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिध्द बहुभाषिक चरित्र अभिनेते पद्मभूषण डॉ. गिरीश कर्नाड यांच्या स्मरणार्थ व प्रसिध्द लोककवी, लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त” नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा – २०२३” चे सलग ५व्या वर्षी मुंबई सर्वोदय मंडळ, ग्रँटरोड येथे शिवजयंतीच्या दिनी शानदार उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लोकशाहिर दत्ताराम म्हात्रे, अभिनेत्री व मॉडेल स्मिता धुमाळ, रंगाविष्कारचे संचालक बजरंग सोनवणे, मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर तसेच नाट्य कलावंत वसंत भातडे, सदानंद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
नाट्य कलावंत वसंत भाताडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात अभिनय, देहबोली, इम्प्रोव्हायझेशन, व्हॉईस अँड स्पीच यांचे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांडून करण्यात येणार आहे. शिबिर संचालक म्हणून बजरंग सोनवणे कार्य करत असून उद्घाटनाचे प्रास्ताविक संचालकांनी केले. उद्घाटना नंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण संचारले होते. कलावंतांना घडविण्याचे पवित्र कार्य करण्याचे भाग्य लाभल्याचे मत संचालक बजरंग सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले.
शिबीराचे समन्वयक म्हणून विनायक जवळेकर, अश्विनी निवाते, आफ्रिन शेख, अमय भोसले, कपिल क्षीरसागर काम जबाबदारीने पार पाडत आहेत. कार्यक्रमाचं समयोचित सूत्रसंचालन मैत्री संस्थेचे कला विभाग प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.