You are currently viewing काव्यसंग्रह – गाठीभेटी

काव्यसंग्रह – गाठीभेटी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार श्री जयराम धोंगडे यांनी कवी प्रल्हाद घोरबांड यांच्या “गाठीभेटी” काव्यसंग्रहाचे केलेले रसग्रहण*

 

*■● रसास्वाद ४ ●■*

 

काव्यसंग्रह:

◆◆● गाठीभेटी ●◆◆

कवी: प्रल्हाद घोरबांड

 

आवडे देवाशी तो ऐका प्रकार |

नामाचा उच्चार रात्रंदिवस ||

तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा |

ऱ्हदय कळवळा वैष्णवांचा ||

म्हणजे भगवंताच्या नामाचे चिंतन आणि गळ्यात तुळशीची माळ हीच गोष्ट देवाला खुप आवडते म्हणून देवाला आवडण्यासाठी वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात, असे तुकोबाराय सांगतात. पांडुरंगाचे वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे अनुसरण करणारे माझे मित्रवर्य श्री प्रल्हाद घोरबांड यांचा नि माझा स्नेहबंध माझ्या गझलसंग्रह ‘शब्दाटकी’च्या प्रकाशन निमित्ताने जुळला. आम्ही दोघेही गणिताचे पदवीधर! माझे गणिताचे श्री जनार्दन लोढे सर म्हणायचे, ‘ज्याचं गणित पक्कं, त्याचे सारे विषय पक्के असतात’. आज मागे वळून पाहताना हे नेहमी आठवतं. समाजात वावरतांना, जे आपण पाहतो, शिकतो, समजतो, भोगतो, देतो, घेतो त्या भावना व्यक्त करण्यासाठी काव्यासारखे अमोघ अस्त्र नाही. त्या अंगाने विचार करता गणिताचा विद्यार्थी साहित्यक्षेत्रात लिहिता होतो, ही कौतुकाची बाब आहे.

 

नांदेड येथील म.फुले शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हादजी संवेदनशिल कवी आहेत. ‘गाठीभेटी’ हा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी तो मला सस्नेह भेट म्हणून दिला. संतसाहित्य, तुकोबांची गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी नित्य वाचीत त्याचे अनुसरण आपल्या जीवनात करणारे प्रल्हादजी घोरबांड ज्ञानदानाचे कार्य करीत अनेक विद्यार्थी घडवीत आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडतांना काही कटू, काही गोड अनुभव त्यांना आले. शिक्षण क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. खाजगी कोचिंगला पेव फुटले आहे आणि मेंढरागत पालक-बालक या मायाजालात अडकत आहेत. हे चित्र पाहून कवी घोरबांड लिहून जातात…

 

सगळेच काही नसतात

आदर्श गुरू गौरव

नेहमीच असतात जास्त

पांडवा पेक्षा कौरव

 

वृक्षमित्र चळवळीसोबतच नांदेड जिल्ह्यामधील विविध सामाजिक चळवळीमध्ये प्रल्हाद घोरबांड यांचा सक्रिय सहभाग आहे. पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे ते सचिव आहेत. प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर राहणारे घोरबांड सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पर्वामध्ये गायीच्या शेणापासून ते पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची निर्मिती करुन प्रदूषण मुक्तिचा संदेश पोचविण्याचे कार्य तत्परतेने करतात. स्वार्थापोटी होणारी वृक्षतोड, गो आणि गोवंश हत्या पाहून व्यथित होणारा हा अवलिया कवी, हाडामासाचा शिक्षक मग वृक्ष लागवडीसाठी धडपडतो.. कुपोषित, वृद्ध आणि आजारी गायींचा गोपालक म्हणून गोशाळा चालवितो… प्रसंगी पदरमोड करून हे उपक्रम राबविणारे प्रल्हादजी घोरबांड जन्मजात उदारता घेऊन जन्मलेत याची जाणीव त्यांच्याच ओळीतून प्रत्ययास येते.

 

दुसऱ्यांना अमृत देऊन

स्वतः विष प्यावे

शंकराची ही उदारता

घेऊनच जन्मा यावे

 

ईश्वराचे चिंतन, त्याचेच नामस्मरण आणि ओतप्रोत भक्ती करावी. साऱ्या चिंता, भोग, यातना, आनंद, सुख, समाधान जे जे काही म्हणून देणारा आणि त्याचे हरण करणारा तोच आहे त्यामुळे आंतरिक ओढीने ईश्वर भजावा. भक्तीचा देखावा नसावा. जन्मदात्या मायबापांची सेवा करावी. सत्यसेवा करावी… लोक काय म्हणतील म्हणून जनलज्जेसाठी सेवेचे नाटक करू नये. हे जसे जन्मदात्याचे तसेच जन्मभूमीचीही सेवा करावी. प्रसंगी जीव द्यावा पण मातृभूमीचे रक्षण करावे असे साधेसोपे तत्वज्ञान शिकवणारे त्यांचे काव्य मनाचा ठाव घेते. प्रल्हादजी लिहितात….

 

ईश्वराची भक्ती करू

मातपित्याची सत्यसेवा

मातृभूमीचे रक्षण करण्या

प्राणातलाही प्राण द्यावा

 

खूप पांडित्य आहे, भरमसाठ ज्ञान आहे. पण ते ज्ञान वाटले नाही, ज्ञानाचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी झाला नाही तर ते ज्ञान कवडीमोलाचे… आणि ज्ञानी ज्ञानदानास तयार आहे परंतु ते ऐकायला कोणी श्रोताच नसेल तर तेही कुचकामीच! तेंव्हा श्रोता आणि वक्ता, कवी आणि रसिक हे परस्परपूरक फायद्यासाठी एकत्र आले पाहिजे… ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे… ‘गाठीभेटी’ घेतल्या पाहिजेत… त्या वाढल्या पाहिजेत, यातच समाजाचे हित सामावले आहे! संवाद आणि दर्शनयोग अर्थात प्रत्यक्ष गाठ-भेट यासाठी केलेली उठाठेव म्हणजे घोरबांड सरांचा हा काव्यसंग्रह ‘गाठभेटी’ वाचनीय झाला आहे, असे मला वाटते.

 

श्रोत्याविना वक्ता नोहे

बोल ज्ञानेशाचे कंठी

कवी श्रोत्यांचा जिव्हाळा असावा

नित्य व्हाव्यात गाठी-भेटी!

 

जीवाला जीव देणारा मित्र, सदैव हसमुख, मनमिळावू आणि देव-देश-धर्म यासाठी नेहमी चिंतनशील आणि क्रियाशील राहणाऱ्या या कविमित्रास त्यांच्या पुढील साहित्य प्रवासास भरभरून शुभेच्छा!

 

जयराम धोंगडे

नांदेड (९४२२५५३३६९)

 

—————————————–

पुस्तकाचे नाव: *गाठीभेटी*

साहित्य प्रकार: *काव्यसंग्रह*

कवी: *श्री प्रल्हाद विश्वनाथ घोरबांड*

प्रकाशक: *संगत प्रकाशन, नांदेड*

पृष्ठ संख्या: *96* / मूल्य: *₹ 150/-*

प्रतिक्रिया व्यक्त करा