छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनापासून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अंगीकार
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ महाराष्ट्राचे राज्यगीत
सिंधुदुर्गनगरी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरूणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या कवीवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे गीत १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगीकारण्यात येत आहे.
हे राज्यगीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता किंवा गाता येईल. राज्य गीत गायन / वादनाच्या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. विचारार्थ राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी राज्यगीताचा मान सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरूवातीला राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले अथवा गायले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा/ प्रार्थना यासोबत राज्यगीत वाजविले अथवा गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास किंवा गाण्यास मुभा राहील. राज्यगीत सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे रहावे व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रीया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सुट देण्यात आली आहे. राष्ट्रगीताच्या बाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीतही बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना किंवा गातांना त्याचा योग्य सन्मान राखावा. वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा. राज्य गीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त आस्थापनांना, कार्यालयांना सूचना देण्याबाबतही शासनाने निर्देशित केले आहे. या राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विनाअनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था, व खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन अथवा वादनामध्येय उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह खालीलप्रमाणे राज्यगीत स्वीकृत करण्यात येत आहे.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ||धृ||
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ||1||
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ||2||”