तरुणाई म्हणजे जाज्ज्वल्य आविष्कार व जबरदस्त उन्मेश -घनशाम पाटील
चिंचवड, पुणे-(प्रतिनिधी)
” तरुणाई म्हणजे जाज्ज्वल्य आविष्कार व जबरदस्त उन्मेश आहे. तरुणांनी आपल्यातील ऊर्जेचा उपयोग राष्ट्राच्या भल्यासाठी करायला हवा “असे प्रतिपादन प्रकाशक व व्याख्याते घनशाम पाटील यांनी केले.
समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित बारावे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन काळभोर नगर येथील प्रतिभा महाविद्यालयात संपन्न झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. मा. घनश्याम पाटील पुढे म्हणाले,
“लेखनाची गुणवत्ता महत्त्वाची असून युवा पिढीने स्वतःला सिद्ध करावे तसेच साहित्यावरची निष्ठा अढळ ठेवावी”
संमेलनाचे उद्घाटक ,पिंपरी चिंचवडचे रा.स्व. संघ संचालक मा.विनोदजी बन्सल, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया ,उपप्राचार्या क्षितिजा गांधी, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र चे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी “एकत्वाचे तत्त्वज्ञान परिपुष्ठ करण्याचे काम साहित्य व साहित्यिक करतात ,म्हणून साहित्याचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. “असे प्रतिपादन मा. प्रसन्न पाटील यांनी केले.” विद्यार्थ्यांमध्ये कसदार वाचन वाढले पाहिजे ,जेणेकरून वाचनातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होऊ शकतात .” असे प्रतिभा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या क्षितिजा गांधी यांनी सांगितले. मा. विनोदजी बन्सल यांनी साहित्यातून अभिव्यक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष सुहास घुमरे यांनी व सूत्रसंचालन कार्यवाह मानसी चिटणीस यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष कैलास भैरट यांनी केले.
संमेलनाच्या पहिल्या सत्राचा शुभारंभ म.फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या ” समरस समाज सरस भारत” या पथनाट्य सादरीकरणाने झाला. यानंतर ‘आजचा युवक मराठी साहित्य वाचतो का ?’ या विषयावर कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.श्रीकांत पाटील यांचे व्याख्यान झाले.” मुले वाचत नाहीत असे म्हटले जाते ते अर्धसत्य आहे. चारित्र्याचे रक्षण करायचे काम वाचन संस्कृती करते. यासाठी मुलांनी संतसाहित्य वाचून त्यातील अध्यात्माचा गाभा अभ्यासला पाहिजे” असे मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा .डॉ.तरुजा भोसले यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व आपल्या व्याख्यानातून विशद केले. सद्विचारांचे अलंकार जेव्हा तुम्ही समाजात मिरवता तेव्हा तुमची प्रतिमा समाजात उजळते. म्हणून मुलांनी सर्वात आधी आपल्या कुटुंबात समरस व्हायला हवे,असे सांगितले. सूत्रसंचलन कवयित्री मृण्मयी नारद यांनी केले.
दुसऱ्या सत्राचा प्रारंभ मॉडर्न महाविद्यालयाच्या “युवकांनो तुम्हाला काही सांगायचे आहे का?” या पथनाट्याने करण्यात आला. यानंतर संपन्न झालेल्या सामान्य ज्ञानावरील आधारित प्रश्नमंजुषेत पाच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अनिता सुळे यांनी केले.यानंतर ज्येष्ठ समाजसेविका मीना पोकरणा यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे असे सांगून स्वतः मधील कौशल्य ओळखून ते विकसित करण्यासाठी प्रयत्नशील रहा असे मौलिक मार्गदर्शन केले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सप्तसूत्री सांगितल्या. ज्येष्ठ उद्योजक अभय पोकरणा यांनी गीत गायनातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद युवा गझलकार व कवी दिनेश भोसले यांनी भूषवले .तर प्रमुख पाहुण्या स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व ज्येष्ठ कवयित्री सविता इंगळे या होत्या. परिचय सुप्रिया लिमये यांनी करून दिला. ज्येष्ठ कवी सुभाष चव्हाण यांनी पोवाड्यातून पिंपरी चिंचवड शहराची महती सांगितली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवा, निसर्ग ,मानवी भावभावना , राष्ट्रप्रेम अशा विविध विषयांवरील कवितांनी कार्यक्रमात बहार आणली. ज्ञानेश्वर सूर्यवंशी या विद्यार्थ्यांने दमदारपणे सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडयाला सर्वांनी मानाचा मुजरा केला. याप्रसंगी सविता इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या कवितांतून अभिव्यक्त होणाऱ्या प्रगल्भ जाणिवांबद्दल त्यांचे कौतुक करून
” प्रत्येक राधेला एक कृष्ण भेटावा “या काव्य सादरीकरणातून मार्गदर्शन केले. दिनेश भोसले यांनी जीवन घडवणे सर्वस्वी आपल्या हातात असते .साहित्याचे पतन होऊ द्यायचे नसेल तर खूप वाचले पाहिजे असे प्रतिपादन केले.
“तिला पाह्यला खिडकीमध्ये झुकला पाउस
तिच्या लाघवी हसण्यामध्ये भिजला पाउस”
या त्यांच्या गझलेला रसिकांची व विद्यार्थ्यांची भरभरून दाद मिळाली.आणि
“कुठलीही देवी होऊन तू स्वतःची फसवणूक करून घेऊ नकोस
त्यापेक्षा तू जिजा… अहिल्या… रमा… सावित्री हो” या कवितेने अंतर्मुख केले. ज्येष्ठ कवी व गझलकार सुहास घुमरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अतिशय रंगलेल्या या संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप समारंभाचे अध्यक्षपद ज्येष्ठ समाजसुधारक मा. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भूषविले. समाजाचे देणे आपण साहित्यातून फेडू शकतो. यासाठी सामाजिक आशय असणारे साहित्य निर्माण व्हायला हवे, त्यासाठी गुलाबाच्या फुलांबरोबर काट्यांचाही परामर्श घ्यायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध चे प्रा.डॉ.धनंजय भिसे यांनी अपयश ही यशाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी पराभवाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील यांनी आजचा तरुण भरकटलेला नसून तो विचारी आहे ,फक्त त्याला विचार मांडायला समरसता सारखे व्यासपीठ मिळायला हवे असे सांगितले. यावेळी संपन्न झालेल्या विविध महाविद्यालयांच्या पथनाट्य स्पर्धांचे परीक्षक व ज्येष्ठ रंगकर्मी किरण येवलेकर यांनी पथनाट्यातून समाजातील फक्त नकारात्मक गोष्टींवर संदेश देण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींवर संदेश द्यायला हवा असे मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास प्रमुख प्रा. डॉ.एस. एम. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध सत्रांमध्ये झालेल्या प्रश्नमंजुषा ,पथनाट्य आणि निबंध लेखन स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन उज्ज्वला केळकर आणि आभार प्रदर्शन शोभाताई जोशी यांनी केले.
या संमेलनासाठी प्रा. तुकाराम पाटील ,राज अहेरराव ,राजेंद्र घावटे, सुरेश कंक, वर्षा बालगोपाल, माधुरी विधाटे, सुभाष चव्हाण, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, काशिनाथ पवार ,विनिता माने,फुलवती जगताप या आणि अशा पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर साहित्यिकांनी उपस्थित राहून संमेलनाला शुभेच्छा दिल्या.तसेच पिंपरी शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा प्रतिसाद लाभला.स्नेहा आढळराव, निरज पाटील ,नयन गोवंडे ,गौरव पाठक यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. शोभाताई जोशी, उज्ज्वला केळकर, निलेश शेंबेकर ,जयश्री श्रीखंडे , पंजाबराव मोंढे,बाळासाहेब सुबंध, समृद्धी सुर्वे ,मंगला पाटसकर, राजेंद्र भागवत, विनोद चटप, सुप्रिया लिमये, रामचंद्र मोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.