*लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार शिवनेरीवर “हिंदवी स्वराज्य महोत्सव”*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
राज्य सरकारतर्फे यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर “हिंदवी स्वराज्य महोत्सव” आयोजित करण्यात आला असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. करोनानंतरच्या काळातील ही पहिलीच शिवजयंती असल्याने ती धुमधडाक्यात साजरी केली जाणार असून यापुढेही याच जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी मुंबईत दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवनेरीवर लाखो शिवभक्त येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्या दिवशी गडावर महाशिवआरतीचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच, पर्यटनवाढीसाठी राज्याचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.