वेंगुर्लेत सतरावे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन; राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार
वेंगुर्ले
शिक्षकांच्या रिक्त असलेल्या 70 टक्के जागा येत्या सहा महिन्यात भरण्यात येतील. शिक्षकांनी वेळेवर शाळेत गेल्यास कोणीही कारवाई करणार नाही. भविष्यात पटसंख्या नोंद आपोआपच राज्यशासना कडे जाईल अशी टेक्नॉलॉजी आणत आहोत. नवीन शिक्षण धोरण राबवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम पाठिंबा देतात. कमी पटसंख्या शाळा सुरू राहणार त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शिक्षकांचा पगार वेळेवर होणार याची खबरदारी सरकार घेईल. शिक्षक सेवकांना आता सोळा हजार, अठरा हजार आणि वीस हजार शिक्षक वेतन दिले जाणार. तसेच लॅब असिस्टंटना सुद्धा सोळा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या बजेटमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेश संदर्भात चांगली बातमी मिळेल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आयोजित सतरावे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन वेंगुर्ले येथे पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने सहा महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विनाअनुदानित 61 हजार शिक्षकांचा एकावेळी विचार करून 1800 कोटी रुपयांचे पॅकेज एका वेळेला उपलब्ध करून दिले. लहान मागणी असली तरीही आपणास सांगा. विद्यार्थ्यांचे परीक्षा पेपर तपासणीसाठी वेगळी यंत्रणा आणत आहोत असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
शाळेतील शौचालय सफाई करण्यासाठी आता ग्रामपंचायत कर्मचारी येणार. शिक्षकांच्या मागण्या संदर्भात विशेष बैठक घेणार असून आता थेट तुम्ही शिक्षण मंत्र्यांशी बोलू शकाल असेही मंत्री केसरकर म्हणाले.