संस्थानकालीन सुंदरवाडी शहराची शान…की सौंदर्यात बाधा…?
संपादकीय…..
“जळी स्थळी काष्ठी पाषाणी राजकारण…!”
अशाच प्रकारची अवस्था अलीकडे जिकडे तिकडे पहायला मिळते…मग तिथे जनतेला त्रास होणार असू देत की जनता वाऱ्यावर पडू दे…राजकीय पक्षाचा वरचष्मा दिसणे आवश्यक…! पण अशा राजकीय नेत्यांनी कधी विचार केला आहे का…की जनतेला त्रास झाला तर निकाल जनताच लावणार आहे…! परंतु पैशाचं राजकारण जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून मत देणारी जनता म्हणजे जुगारावर लावण्याचा पत्ता बनली आहे. राजकारणी सांगतील तेच करणार असाच सर्वसाधारण राजकीय धुरादरांचा समज झाला आहे. त्यामुळे सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर राजकीय लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला नाहक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडीच्या आठवडा बाजाराची तर गाढवावरून वरात काढत असल्याचे दिसून येत आहे. गांधी चौकातून – उभा बाजार – जिमखाना मैदान – मोती तलाव फुटपाथ असा प्रवास करत वर्षभर बाजाराने तलावाचे सौंदर्य पाहत नैसर्गिक वातावरणात हनिमून पार पाडले. आता पुन्हा बाजाराची वरात होळीखुंट परिसरातील रस्त्यावर जाणार असल्याचे समजते. तलावाच्या काठी बाजार भरवून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी आपण सावंतवाडी करांचे भले पाहत असल्याचा आभास निर्माण केला परंतु सावंतवाडी मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना शहराचे विद्रूप रूप दाखवून काय मिळविले…? असाही एक प्रश्न सावंतवाडी वासियांना पडला. सावंतवाडी शहराची विस्तीर्ण अशी बाजारपेठ असून आठवडा बाजार बाजारपेठेच्या नजिक भरत असल्याने शहरातील स्थानिक भाजी विक्रेते आणि इतर व्यावसायिक मात्र मंगळवार, बुधवार हातावर हात धरून बसलेले असतात. स्थानिक व्यापारी देखील पोटासाठी व्यवसाय करतात परंतु आठवडा बाजार तलावाच्या काठी भरत असल्याने गिऱ्हाईक मार्केट पर्यंत पोहचत नाही पर्यायी स्थानिकांचा व्यापार होत नाही. मंगळवारी तर सावंतवाडी बाजारपेठेत दिवसभर शुकशकाट असतो. त्यामुळे बाजार तळ्याकाठी बसणे स्थानिकांच्या दृष्टीने नुकसानकारक आहे.
उभाबाजार परिसरात आठवडा बाजार बसायचा तेव्हा मुख्य मार्केट मधील व्यापाऱ्यांना देखील गिऱ्हाईक मिळत होते. गांधी चौक, जयप्रकाश चौक आदी परिसरात गिऱ्हाईकांची वर्दळ असायची, व्यापार व्हायचा. परंतु नगरपालिकेत सत्ता बदल झाल्यापासून बाजाराची वरात काढून बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी जनतेला देखील मानसिक त्रास देण्याचेच उपद्व्याप सुरू आहेत. ना जनतेचा कोणी विचार करीत ना स्थानिक व्यापाऱ्यांचा, तर पाहतात तो फक्त राजकीय स्वार्थ. राजकीय पक्षांनी नगरपालिकेच्या अधिकारांवर गदा आणण्यापेक्षा नगरपालिका प्रशासन व व्यापाऱ्यांना बाजार बसविण्याबाबत निर्णय घेऊ द्यावा. केवळ आपल्या हाताशी धरलेल्या आणि बाजाराशी देणे घेणे नसते त्या व्यापाऱ्यांना पुढे करून राजकीय खेळी न करता व्यापारी आणि जनतेच्या भल्याचा विचार करावा अन्यथा हीच जनता राजकीय लोकांना त्यांची जागा दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही.
आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात बसविण्याची माहिती नाम.दीपक केसरकर यांनी देताच तात्काळ त्यावर विरोधकांकडून मीटिंग लावून विरोध करण्याची भाषा होऊ लागली. परंतु शांत सुसंस्कृत सावंतवाडी शहराचे वातावरण बिघडविण्याचा डाव का आखायचा? श्रेय घेण्याचा नादात विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा विठ्ठल मंदिर पासून होळी खुंट परिसर हा कमी वर्दळीचा असून रस्ते देखील मोठे आहेत. मोठ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग आहेत. त्यामुळे आठवडा बाजार त्या परिसरात बसविण्यास पुढाकार घेऊन सावंतवाडी सारख्या सुंदर शहराचे विद्रुपीकरण थांबविणे आवश्यक आहे. सावंतवाडीतील कोणीही शहरप्रेमी नागरिक तलावाच्या काठावर प्लास्टिक लावून शहराच्या होणाऱ्या विद्रुपीकरणाला प्रोत्साहन देणार नाही. रोज रात्री आठवडा बाजार आटोपल्यावर तलावाच्या फुटपाथवर बघू शकणार नाही एवढी घाण हे बाहेरून येणारे व्यापारी करत असतात. *पहाटे साडेपाच सहा वाजल्यापासून दुकाने थाटली जातात परंतु पहाटे तलावाच्या काठावर गुटखा खाऊन थुंकून, पिचकाऱ्या मारून जी घाण करतात त्यावरून पहाटे मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक त्रस्त होतात* ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा शहराचा चेहरा, शान अशी ओळख असणाऱ्या मोती तलावाच्या काठावरच आठवडा बाजार बसविण्याचा बालिश हट्ट हे राजकीय लोक का करतात…? का या राजकीय लोकांना सुंदर सावंतवाडी शहर नको आहे…? शहराच्या विद्रुपीकरणामध्ये आनंद भेटतो की फक्त विरोधासाठी विरोध करून शहराचे सौंदर्य खराब करायचे…?
सावंतवाडी वासियांना नक्कीच या विषयांवर सर्वोतोपरी विचार करावा आणि जागोजागी पान, गुटखा खाऊन शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारा आठवडा बाजार तलावाच्या काठावरून इतरत्र नेण्यास सहकार्य करणे आवश्यक आहे.