You are currently viewing गुलाबी प्रेम

गुलाबी प्रेम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉक्टर मृदुला कुलकर्णी (खैरनार) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गुलाबी प्रेम*

गुलाबी गुलाबी फुलावा फुलोरा
मनाला मनाचा कळावा इशारा !

सडा हा सुगंधी फुलांचा गुलाबी
सख्या साजणाची मिठीही गुलाबी
गुलाबी हवेचा गुलाबी शहारा
मनाला मनाचा कळावा इशारा !

तुझे प्रेम मजला सदाही मिळावे
तुझ्या संगती चांदणे ते पहावे
रुपेरी क्षणांच्या जुळाव्यात तारा
मनाला मनाचा कळावा इशारा !

असे रात्र वेडी तुझ्या आठवांची
सुखा सोबतीच्या उमलत्या क्षणांची
कसे सावरू मी, न चित्तास थारा
मनाला मनाचा कळावा इशारा !

मनी मोर माझ्या फुलवतो पिसारा
मनाला मनाचा कळावा इशारा !

डॉ. मृदुला कुलकर्णी (खैरनार)
पुणे. 11/2/22

 

प्रतिक्रिया व्यक्त करा