You are currently viewing वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांना अधिकृत स्टॉल, गाळे उपलब्ध करून देणार – आ. नितेश राणे

वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांना अधिकृत स्टॉल, गाळे उपलब्ध करून देणार – आ. नितेश राणे

वैभववाडी

वैभववाडीत रोजगार करणाऱ्या स्टॉल धारकांना नगरपंचायत वाऱ्यावर सोडणार नाही. लवकरच त्यांना अधिकृत स्टॉल अथवा गाळे उपलब्ध करून देणार. स्टॉल धारकांना व शहरवासीयांना विश्वासात घेऊन राज्यात वैभववाडी शहर आदर्श शहर बनविणार असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांचा विषय अनेक दिवस ऐरणीवर आला आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतने रस्ता कडेला उभारलेले अनधिकृत स्टॉल हटाव मोहीम सुरू केली होती. दरम्यान सोमवारी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडीतील स्टॉल धारकांची बैठक पार पडली. या बैठकीत स्टॉल धारकांनी सहकार्याची भूमिका घेतली. दोन दिवसात स्टॉलधारक स्वतःचे स्टॉल स्वतः काढणार आहेत. असे त्यांनीच मान्य केले आहे.

मच्छी मार्केट विक्रेत्यांची तात्पुरती सोय गणेश घाट विसर्जन रस्त्यावर करण्यात आली आहे. ते उद्यापासून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जाणार आहेत. त्यांना पाण्याची व विजेची सोय नगरपंचायत करून देईल तसेच गोडाऊनच्या ठिकाणी अन्य स्टॉल धारकांना अधिकृत स्टॉल अथवा गाळा बांधून देणार आहे. दुमजली इमारत बांधून नगरपंचायत त्याची सोय करणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले.
1 मे पर्यंत सुनियोजित स्टॉल, गाळे पूर्ण होतील. व त्यांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होईल असे त्यांनी सांगितले.

मात्र एका व्यक्तीला एकच स्टॉल मिळणार आहे. त्याचे भाडे नगरपंचायत घेईल, अन्य कोणत्याही व्यक्तीला भाडे द्यायचे नाही असे आमदार नितेश राणे यांनी उपस्थिताना ठणकावून सांगितले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती जयेंद्र रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा