भरधाव डंपर महामार्गावरील स्टॉल उडवत पाच फुट घळणीत कोसळला…
तेर्से-बांबर्डेतील घटना; रक्तबंबाळ अवस्थेत चालकाचे पलायन, नंबर प्लेटा गायब…
कुडाळ
वाळू वाहतूक करणार्या भरधाव जाणाऱ्या डंपर चालकाने रस्त्याच्या बाजूला असलेला स्टॉल उडविल्याचा प्रकार रात्री साडे बाराच्या सुमारास तेर्से-बांबर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला आहे. त्यानंतर संबधित डंपर बाजूच्या पाच ते सहा फुट घळणीत कोसळला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या चालकाने रक्तबंंबाळ अवस्थेत पळ काढला. तो अद्याप पर्यंत सापडला नाही. परंतु त्या ठिकाणी झालेला अपघात लक्षात येवू नये म्हणून गाडीच्या नंबर प्लेट काढून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही झाला आहे. याबाबत अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलिस हवालदार हनुमंत धोत्रे यांनी सांगितले.
याबाबत स्थानिकांकडुन मिळालेली अधिक माहीती अशी की, संबधित डंपर हा कुडाळ वरुन सावंतवाडीच्या दिशेने वाळू घेवून जात होता. मात्र भरधाव वेगात असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बाजूला असलेल्या स्टॉल उडवून देत तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या घळणीत कोसळला. हा प्रकार घडल्यानंतर त्या ठीकाणी काही प्रवासी जमले. परंतू तत्पुर्वी त्या डंपरचा चालक गाडीतून बाहेर येवून रक्तबंबाळ अवस्थेत पळून गेला. त्याच्या रक्ताचे डाग रस्त्यात पडलेले दिसल्याचे प्रत्यक्षदर्शीकडुन सांगण्यात आले. मात्र अपघात घडल्याचे कळताच रातोरात त्या गाडीत असलेली वाळू त्या ठीकाणी पसरवून टाकण्यात आली. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान याबाबतची माहीती पोलिस हवालदार श्री. धोत्रे यांना विचारली असता त्यांनी दुजोरा दिला आहे. अपघात झाल्याचे कळले त्या ठीकाणी आम्ही रात्री जावून भेट दिली. पंचनामा केला परंतू नेमका चालक कोण हे कळू शकले नाही. अधिक माहीती घेतली असता गाडी गोवा येथिल व्यक्तीची असल्याचे कळले. परंतू आपल्याकडे असलेला वाळूचा पास गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्याला दुय्यम प्रत आणा ,असे आपण सांगितले आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. या प्रकरणी त्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तो मुळ झारखंड येथिल आहे. त्याचा पत्ता तसेच मोबाईल नंबर आपल्याला माहीती नाही, असे मालकाचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिक चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.