You are currently viewing शिवसेनेचा दसरा मेळावा आणि ज्याचे त्याचे सीमोल्लंघन!

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि ज्याचे त्याचे सीमोल्लंघन!

अखेर यावर्षीचा शिवसेनेचा बहुचर्चित मेळावा शिवतीर्थाऐवजी वीर सावरकर सभागृहात पार पडला. लाखो शिवसैनिकांच्या ऐवजी पन्नास निवडक नेते आणि बाकी टाळ्या वाजवणाऱ्या रिकाम्या खुर्च्या यांच्या उपस्थितीत तो संपन्न जाहला. या मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे भाषण आणि त्यावरच्या विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया यातून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात अजूनही उलटसुलट लाटा उठत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य भाजपा, त्यांचे हिंदुत्व, राज्यकारभार, राज्यपाल, मोदींसह भाजपाचे काही नेते अशा अनेक बाबींवर जहरीले टीकास्त्र सोडले. त्यामुळे घायाळ झालेल्या भाजपा नेत्यांनी लागलीच प्रतिहल्ले चढवायला सुरुवात केली. आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंवर टीका केली, तर भाजपाचे खासदार असलेले कोकणचे आक्रमक नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीकेची तोफ डागली. वाघ, बेडूक, पिल्ले यातून सूरु झालेली ही लढाई महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला चक्क गांडुळ ठरवण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

वादविवाद राज्याला नवे नाहीत. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास प्रत्येकच निर्णय वाद जन्माला घालूनच पुढे सरकत आहे. सत्तेसाठी तीन विरोधी विचारांच्या पक्षाची आघाडी, राज्यातील सर्वात मोठा पक्ष विरोधात, त्यात परत प्रत्येक पक्षातील आपसी अंतर्गत धुसफूस, उद्याच्या परिस्थितीबाबत कोणालाही कसलीच शाश्वती नसलेला भविष्यकाळ, आणि आहे त्यात आपल्याला काय मिळणार ते साधून घेण्यासाठी अनेकांची चाललेली धडपड अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणि झालेल्या घडामोडींमागचा अर्थ आणि स्वार्थ शोधायलाच हवा.

फार पूर्वीपासून भारतात चाणक्यनीती, कणिकनीती, विदुरनीती अशा अनेक राजकीय नीती भारताने पाहिल्या आहेत. आता विचार केला, तर नवीन काही नीती उदयाला आलेल्या दिसतात. त्यामागे कधी शरद पवारांचे, संजय राऊतांचे, तर कुठे अमित शहांचे नाव जोडले जाते. राजकारणातल्या आजच्या अतर्क्य, विचित्र, साहसी, धाडसी, तामसी अशा चित्रविचित्र प्रकारांमागची विचारधारा शोधताना या नितींचा अभ्यास करणे कधीकधी फारच मनोरंजक ठरते.

कालच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे राजकीय अभ्यासकांनी त्यादृष्टीनेही पाहणेही मजेशीर ठरेल.

सत्तास्थापनेच्या दरम्यान झालेल्या न भूतो न भविष्यती घडामोडी आपण सर्वांनी अनुभवल्याच आहेत. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषित होऊन त्यावर पडदा पडला. पण तो फक्त पहिल्या अंकावरचा पडदा आहे हे सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आणि वक्तव्ये रोजच होत आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यात जनतेपेक्षा अदृश्य किंगमेकरचा हात आहे, हे सरळ दिसत होते. त्या ‘मिस्टर इंडिया’ च्या भूमिकेत शिरत स्वतःला लार्जर दॅन सीएम, एवढेच नव्हे तर लार्जर दॅन शिवसेना सिद्ध करण्यासाठी खासदार संजय राऊत यांची धडपड चाललेली सहज दिसून येते. त्यांच्या सर्व मुलाखती बारकाईने अभ्यासल्यास हे सहज लक्षात येते.

आणि कालचा “महा विजयी दसरा मेळावा” हा अशाच बेरकी राजकारणाचा रंगतदार प्रयोग होता हे मानायलाच हवे. कळत नकळत या राजकारणाचा उद्धव ठाकरे बळी झाले आहेत. पण या पटकथेचे लेखन हे एकंदरीतच फार निष्णात कौशल्याने केले आहे. सरकारवर टीका होणार हे जाणून हे “ठाकरे” सरकार म्हणून ओळखले जात आहे, असा शिक्का मारून ठेवण्याचे पुरेपूर कपट रचले गेले आहे.

सर्वात पहिली गोष्ट, म्हणजे खा. संजय राऊत यांनी येथे स्वतः केलेले प्रास्ताविक. अगदी बेमालूमपणे संजय राऊत यांनी आपले बेअरिंग बदलले आणि अतिशय हुशारीने त्यांनी स्वतःची प्रतिमा ही शांत, संयमी, ठाम आणि प्रगल्भ नेतृत्वाकडे जात आहे हे दाखवून दिले. आपणच इथल्या सगळ्याचे कर्ते-करवीते आहोत, हे त्यांनी अतिशय खुबीने महाराष्ट्रासमोर मांडले, शिवसैनिकांवर ठसविले.

त्याचवेळी मुरब्बी शरद पवारांना मधाचे बोट लावत आपले मधुर संबंध जपण्याची त्यांचा अगतिक खटाटोपही भाषणात दिसतो. मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, या काव्यपंक्ती म्हणतानाच, “भविष्यात कळेल, या राष्ट्राचे नेतृत्व महाराष्ट्रच करणार आहे ते कोण आणि कसं करणार हे सुद्धा आम्हाला लवकरच सांगावं लागेल” असे सांगत नाव न घेताही पवारांना खुश करायला ते या सगळ्यात विसरले नाहीत.

दुसरी गोष्ट तितकीच महत्वाची होती. गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिक नाराज आणि शिवसेनेपासून फार दुरावलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. शिवसैनिकांसोबतच अगदी आमदार खासदारही नाराज आहेत. कारण राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि वरचष्मा राष्ट्रवादीचा आहे. केंद्रात भाजपा स्वबळावर पुरेसे संख्याबळ असल्याने वारंवार अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या सेनेला विचारात घ्यायची त्यांना गरज उरलेली नाही. शिवसैनिकांना कोणीतरी डिवचले तर ते वारूळातल्या मुंग्यांप्रमाणे आक्रमक होत एकत्र येतात, हे या अनुभवी मिस्टर इंडीयाला पक्के माहीत होते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांना ज्यांनी भाषण लिहून दिले, त्याने उलट प्रतिक्रिया काय येणार याचा विचार करूनच तसे भाषण लिहून दिले असावे.

उद्धव ठाकरे यांचे भाषण त्या अर्थाने पाहिले पाहिजे. त्यांनी टीका करताना रा. स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे वारेमाप कौतुक केले. शिवसेनेची भूमिका ही भागवतांच्या मताला मानणारी हिंदुत्ववादी शिवसेना असल्याचे अगत्याने सांगून त्याचवेळी, भागवत यांची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या काळ्या टोपीखालच्या डोक्यात मेंदू आहे का असा प्रश्न विचारला. म्हणजे एकीकडे भागवत आणि संघकार्यकर्त्यांमध्ये अंतर पाडायचे, दुसरीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करून त्यांना घायाळ करायचे असा हा हुकुमी डाव होता. संघापाठोपाठ भाजपावर टीका करताना त्यानी पलटवार होईलच याची पुरेपूर काळजी घेतली. गरज नसतानाही नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांना डीवचले. रावसाहेब दानवे यांचा बाप काढला. भाजपाच्या नेतृत्वावर कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नेत्यांना हवे तसे खेळवत असल्याचा आरोप करत तिथे दुधात मिठाचा खडा टाकला. खडसेंपाठोपाठ भाजपात नाराजी उफाळुन यावी यासाठी मारलेला हा खडा होता. आपल्यावर आजवर टीका करणाऱ्यांच्या तोंडात गोमूत्र आणि शेण भरले असल्याचा बेछूट आरोप करत ही विरोधाची धार संतापात बदलावी याची व्यवस्थित काळजीही घेण्यात आल्याचे दिसते. कारण पलटवार होऊन शिवसेनेवर टीका होणार आणि ही टीका जेवढी अधिक तेवढा शिवसैनिक पेटणार ही रणनीती आखूनच हा बेरकी व घातक डाव मांडला गेला होता. परिणामही तसाच झाला. भाजपा नेते आशिष शेलार यांनाही संजय राऊत यांच्या संयत भाषणाचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. पण आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर, राणे परिवार यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले. नारायण राणे यांचा पलटवार तर तेवढाच धारदार होता. निर्बुद्ध, पुळचट, शेळपट आदी शेलक्या विशेषणांचा भडीमार करत नादाला लागलात, तर कपडे सांभाळत पळण्याची वेळ येईल,मातोश्रीची आतल्या बाहेरच्या भानगडी चव्हाट्यावर येतील अशी धमकी त्यांनी दिली. सोशल मीडियावरदेखील उद्धव ठाकरे फार मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. अर्थातच, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या त्यांच्या दोन्ही इमेज डॅमेज करण्याचा ‘मिस्टर इंडिया’चा डाव अखेर फार धूर्तपणे यशस्वी केला गेलाच! आता यापुढेही ही धुळवड अशीच काही दिवस खेळली जाईल. आणि त्याच धुळीखाली खूप काही प्रकरणे झाकण्याचाही प्रयत्न होईल.

या सगळ्यात लोकशाहीचा मात्र दम घुटला आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे सरकार ही शाळेत शिकवले जाणारी व्याख्या किती खुळचट होती, हे स्पष्ट झाले. दिशा सालीयन या तरुणीचा झालेला संशयास्पद मृत्यू, सुशांत राजपूत या अभिनेत्याची आत्महत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्यसरकारने वापरलेली अमानुष पोलीस यंत्रणा, कंगना राणावतचे घर पाडण्यासाठी कोर्टाचा आदेश न मानताही भर पावसात सुडबुद्दीने बीएमसीचा केलेला गैरवापर, माजी वृद्ध नौदल सैनिकाला शिवसैनिकांनी केवळ व्यंगचित्र काढले म्हणून केलेली बेदम मारहाण आणि त्या गुंडांना सरकारने दिलेली सहानुभूतीची वागणूक, परप्रांतीय युवकाला अशाच प्रकारातून शिवसैनिकांनी मुंडण करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ व्हायरल करत त्याचे खुलेआम समर्थन करणे, लोकांच्या मनात स्थान मिळवलेल्या आणि या प्रकरणात सरकारला हैराण करून सोडलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या एक हजार पत्रकारांवर गुन्हे दाखल करत केलेली मारहाण अशा कितीतरी प्रकरणात सामान्य जनतेचा सरकार या यंत्रणेवरचा विश्वासच उडाला आहे. बेरोजगारी, कोरोनात अनेक पेशन्टची झालेली प्रचंड आर्थिक लूट, याच काळात वैद्यकीय साहित्य व सेवेत करण्यात आलेला करोडोचा भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पावसाने उडवलेली शेतकऱ्यांची दैना यावर मुख्यमंत्री म्हणून ठामपणे निर्णय घेतले गेले असते, तर या दसऱ्याच्या मेळाव्याला सुवर्णाचा स्पर्श झाला असता. पण दुर्दैवाने सामान्य जनतेला उबग आला आहे अशा घृणास्पद शह- काटशह यांच्या राजकारणाचा नकोसा झालेला दर्पच यातून सामान्य जनतेच्या वाट्याला आला. लोकांना या कशातही आता स्वारस्य उरलेले नाहीय. त्यांचे जगण्याचे प्रश्न आणि या राजकीय नेत्यासमोरचे इश्यू यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध उरलेला नाही. ही परिस्थिती अशीच राहिली, तर दसऱ्याच्या मुहूर्तावरच आता शमीच्या झाडावरची शस्त्रे उतरवण्याचा निर्णय जनतेला घ्यावा लागेल. जगावं की मरावं, हे एकदाच फायनल करावं लागेल. अराजकाची स्थिती ही झारसारखी उन्मत्त आणि विवेक हरवलेली राजवट कशी नेस्तनाबूत करू शकते हे रशियाच्या इतिहासातून शिकायला काय हरकत आहे?

वातावरणात आज तोच तप्त वणव्याचा दाह आहे, पोटात भुकेची भेसूर आग आहे, रोम जळतानाची निरोच्या फिडेल वाद्याची पुन्हा तीच बेफिकीर धून आहे आणि “ब्रेड मिळत नसेल तर केक खा” म्हणत जनतेच्या सुखदुःखाची जाणीवही नसलेल्या अज्ञानी राजकीय बेमुर्वतगिरीचा माज आहे. दसरा तर झाला, आता ज्याच्या त्याच्या सीमोल्लंघनाचा मुहूर्तच या नव्या झारांच्या राजवाड्याच्या भिंतींचे आयुष्य ठरवणार आहे!!

—अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575

प्रतिक्रिया व्यक्त करा