You are currently viewing श्री गजानन महाराज चरणी अर्पण केलेली “कमल पुष्पें

श्री गजानन महाराज चरणी अर्पण केलेली “कमल पुष्पें

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर यांनी शेगावच्या श्री गजानन महाराजांचा ‌प्रगट दिना निमीत्त श्री गजानन महाराज चरणी अर्पण केलेली “कमल पुष्पें..*

पहिले नमन ,हेरंबाला
विघ्नहर्त्या श्री गणेशाला
दुसरे नमन श्री शारदेला
लिखाणास स्फूर्ती द्यावी,या मंजिरीला

*गजानन कमल पुष्प (१)*

प्राचीच्या बालरवीवत सुरूप
तपोबलाने तेजाळले रूप
उदयांचली ” गजानन कमल” उमलले
अखिल जगताला,सुवासे गंधाळले.‌

उष्ट्या पत्रावळीतील
शीते हो वेचीली
‘अन्नपूर्णब्रम्ह ‘श्रीं’नी
शिकवण ही दिली.

*गजानन कमल पुष्प(२)*

काशीच्या गोसाव्याचा
नवस, गांजा अर्पिण्याचा
स्विकार करूनी गांजाचा
पुरविला ‘लाड’ गोसाव्याचा.

जानरावाचा अंतकाळ
पदतीर्थाने चुकविला
साधुत्वाची चाड राखण्या
वरपांगी कडकपणा धरिला.

*गजानन कमल पुष्प(३)*

जानकीरामे विस्तव ना दिला
आव्हान दिले विस्तव पेटविण्याचे
नुसती काडी धरूनी,चिलमीवरी
“श्रीं” नी प्रगटन केले वैश्वानराचे

चिंचोलीच्या माधव विप्रास
धाक दाखविला,कळी काळाचा
अशाश्वताचा पाठलाग सोडून
संदेश दिला, शाश्वत ईश पूजनाचा.

*गजानन कमल पुष्प(४)*

बंकटलाला सदनी
महाराजांचे आगमन
विविध पक्वांनाचा थाट
भक्तांचे ,प्रसन्न मन.

पचन शक्ती असूनही
उलटी केली खळाळून
आग्रह करणे न चांगले
शिकविले स्व कृतीतून.

*गजानन कमल पुष्प(५)*

पिंपळगावचे भोळे रहिवासी
भजनी लागले,”श्री” चरणासी
बंकटलाल अक्रूर बनूनी
गजाननासी, परत नेले शेगावासी

समाज हिताचे भान राखत
कोरड्या विहिरीस भरविले जळाने
भास्करास दिली उपरती
भक्तीमार्गास लाविले,श्री गजाननाने.

*गजानन कमल पुष्प (६)*

पेंच ठरले निर्बळी,हरीचे
गर्वहरण हरीपाटलाचे केले
पाटलाच्या दुस-या मुलांनी
उसाचे वार करूनी परिक्षले.

चरकावाचून ईक्षुरस काढला
योगशक्तीचा दाविला चमत्कार
बलशाली राष्ट्रासाठी
करा योगाचा अंगीकार..

*गजानन कमल पुष्प(७)*

मधु तेथे माशा जमती
कुणीच नसे संकटकाळी
जीवनातले कटु सत्य
बंकटास समजविले योग्य वेळी.

कर्मठ व्रजभूषण विप्रास
आलिंगले श्री गजाननाने
तपा‌चरणाचे फळ मिळाले
धन्य झाला विप्र “श्री” दर्शनाने

*गजानन कमल पुष्प (८)*

बाळाभाऊस देऊनी मार
अधिकार त्याचा दाखविला
त्यायोगे भास्कराचा अहंकार
महराजांनी हो निवटला.

सुकलालची द्वाड धेनु
महाराजांनी केली शांत
लक्ष्मण घुडेची व्याधी हरली.
पण दांभिकता पाहून झाले संतप्त

*गजानन कमल पुष्प (९)*

स्वार्थ दृष्टी बळावता
निती विलया जातसे
पाटील देशमुख भांडणात
अंती ,सत्याचा विजय झालासे.

जळत्या पलंगावरी बैसोन
महाराजांनी केले सिद्ध
नैनं छिन्दन्ती पावक
पहाता,ब्रम्हगिरी झाला हतबुद्ध.

*गजानन कमल पुष्प (१०)*

अश्वाच्या द्वाड पणाचे उच्चाटन
महाराजांनी केले लीलया
श्रींच्या कृपेने आपणा सर्वांचे
सर्व दुर्गुण जावोत विलया.

बाळकृष्ण बुवाला दर्शन
“रामदास स्वामींच्या” दिले रूपात
शरीर वस्त्र,आत्म्याचे निवेदन
केले किती सोप्या शब्दात.

*सौ.मंजिरी अनसिंगकर*
नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा