*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सुमती पवार यांनी करून दिलेला अभ्यासपूर्ण ग्रंथपरिचय*
*वैचारिक मुल्यांचा एक विशेष दस्तऐवज: ‘विचार पेरत जाऊ…!’*
-प्रा.सुमती पवार
———————————–
ग्रंथ-विचार पेरत जाऊ! (वैचारिक लेखसंग्रह)
संपादक-डॉ.प्रतिभा जाधव, अलका कुलकर्णी
प्रकाशन- संस्कृती प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष- ऑक्टो.२०२२
मूल्य- रु.४२५
एकूण पृष्ठ-२८८
समाजात काही माणसांचा जन्म फक्त नि फक्त समाजासाठीच झाला आहे याची शेकडो उदा.आपल्याला समाजात सापडतात. महात्मा फुले यांच्यापासून ते बाबा आमटे यांच्यानंतरही अनेक उदा. आपल्याला देता येतील. स्वत:च्या संसारावर निखारा ठेवणाऱ्या ह्या लोकांच्या आसपासही वावरण्याची आपली पात्रता नाही हे जरी खरे असले तरी काही धगधगते निखारे आजही ती पाऊलवाट चोखाळत आहेत हे पाहून आश्चर्य आणि कौतुकही वाटते. असाच एक धगधगता तळपता निखारा म्हणजे प्रतिभा घेऊन जन्माला आलेली प्रज्ञावंत व जातिवंत अशी तेजस्वी, लखलखती ज्वाला म्हणजे, नाशिकचा सन्मान असलेल्या डॉ. प्रतिभा जाधव होत. फार दिवस नाही झाले तिला भेटून तरी तिला पहिल्या भेटीतच म्हटले होते, बाई, तुझी झेप फार मोठी आहे, मार भरारी!
मुळात ‘विचार पेरणे’ ही संकल्पनाच अनोखी आहे. आपण जगातील कोणत्याही क्रांतीचा किंवा स्वातंत्र्यलढ्याचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की, प्रत्येक क्रांती किंवा लढ्याच्या मुळाशी लेखणीच आहे. अगदी फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय स्वातंत्र्य लढा येथ पर्यंतचा प्रवास बघितला तर ह्या सर्व कार्याच्या मुळाशी तुम्हाला लेखणीच दिसेल. कारण लेखणी मानवाच्या मेंदूचे खाद्य आहे. वाद्यांच्या गर्जनेने झोपलेला कुंभकर्ण जागे व्हावा त्या प्रमाणे शतकानुशतके निद्रिस्त समाज घणाघाती लेखणीच्या वाराने खडबडून जागा होतो व आपले वर्तन तपासून पाहतो आणि मग आपल्या वर्तनाची शिसारी येऊन तो झडझडून कामाला लागतो. लेखणी ‘ब्रेन वॅाशिंग’ करते म्हणून मोठमोठे विचारवंत वैचारिक क्रांती घडविण्यासाठी ‘लेखणी’ या शस्राचाच वापर करताना दिसतात. तेच काम आपल्यापरिने डॉ.प्रतिभा जाधव व अलका कुलकर्णी या जोडीने केले आहे.
कोविडच्या त्या भयकारी दिवसातही, जग सुन्न झालेलं असताना हा अस्वस्थ आत्मा अशांत होता. किंबहुना अशांतता हाच तिचा स्थायीभाव असावा इतकी ती कार्यमग्न असते आणि आज बिघडलेले समाजस्वास्थ्य पाहता व स्त्रियांची एकूणच परिस्थिती पाहता ही अस्वस्थता सामाजिक बनावी हा तिचा प्रयत्न आहे व त्या दिशेने तिची वाटचाल चालू आहे हे डॉ. प्रतिभा जाधव आणि अलका कुलकर्णी ह्या दोघींनी संपादित केलेल्या ‘विचार पेरत जाऊ’ या वैचारिक ग्रंथावरून दिसते. कोविड काळात ‘ऑनलाइन’ प्रकरण आपल्या बऱ्याच पथ्यावर पडले. कोणत्या माध्यमाचा कसा उपयोग करावा? हे व्यक्तिसापेक्ष व व्यक्तिच्या सुज्ञपणावर अवलंबून असते. प्रतिभा आणि अलका त्याचा वापर करणार नाही हे कसे शक्य आहे? त्यांनी तो केला नि समाजातील असे काही विचारवंत निवडले की त्यांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले व त्याच मालिकेचे फळ म्हणजे ‘विचार पेरत जाऊ!’ हा सुंदर वैचारिक ग्रंथ होय.
वास्तविक त्या पूर्ण वैचारिक व्याख्यानमालिकेची मी पूर्णवेळ साक्षीदार आहे. ह्या व्याख्यानमालेसाठी डॉ. प्रतिभाने अशी काही माणसे व विचारवंत निवडले की, ते त्यांना दिलेल्या विषयाला खरोखर न्याय देऊ शकतील म्हणून या विचारवंतांच्या मांडणीचा पुस्तकरूपाने निघालेला हा ठेवा म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज ठरावा एवढे त्याचे साहित्यिक व संदर्भमूल्य मोठे आहे. या ग्रंथात एकूण १५ दीर्घ वैचारिक लेख असून ग्रंथाचे अंतरंग पुढीलप्रमाणे- बहुसंख्यांकांचे भयावह मौन-बी.जी. वाघ, वैचारिक परंपरा आणि आपण-प्रा.दिलीप चव्हाण, कोरोना विश्वयुद्धाची सत्यकथा- डॉ.श्रीपाल सबनीस,५१ टक्क्यांचे समाजकारण- राज असरोंडकर, साहित्य, समाज आणि आजचे सांस्कृतिक वास्तव-डॉ. मिलिंद कसबे, कोण असतात ही माणसं?-हेरंब कुलकर्णी, संविधानिक मूल्यांचे विलगीकरण:नागरिकीकरणासमोरील आव्हाने-डॉ.लक्ष्मीकांत कावळे, लोककलावंतांची सद्यस्थिती-डॉ.गणेश चंदनशिवे, प्रबोधन कवितेतील गेय परंपरा आणि आजचा काळ-गंगाधर अहिरे, भटके विमुक्त:समाज आणि साहित्य-डॉ.सुदाम राठोड, लॉकडाऊनने काढलेल्या ‘वंचित’तेच्या खपल्या-दीप्ती राऊत, लॉकडाऊन आणि महिला-ऍड.मिलन खोहर, नवआंबेडकरी युवा कवितेतील जाणिवा-शमीभा पाटील, आरोग्य आणि सामाजिक न्याय-डॉ.बाळ राक्षसे, .सांस्कृतिक राजकारण व नवसंस्कृतीच्या दिशा-लोकशाहीर संभाजी भगत हे लेख समाविष्ट आहेत.
डॉ.मिलिंद कसबे म्हणतात, साहित्य ही गोष्ट विशिष्ट नोकरी, सेक्टर, घटनेपुरती मर्यादित नाही किंवा कोणत्याही जातीधर्म स्तराशी त्यास देणे-घेणे नसते. साहित्य हे समाजाचे अपत्य असते. त्यामुळे समाजात होणाऱ्या सर्व घडामोडी त्यात येतात नाही तर ते साहित्य वांझोटे ठरते. “नाचणाऱ्या बाईच्या रंगलेल्या चेहऱ्याकडे पाहण्याऐवजी तिचा भंगलेला चेहरा आपल्या दृष्टीपथात कधी घेणार? हा त्यांचा प्रश्न विचार करायला लावतो. राज असरोंडकर म्हणतात, आजकाल सत्तेवर येणे एवढाच फक्त अजेंडा असतो. ‘जातीचा अभिमान बाळगून तुम्ही
जातीवादाविरूद्ध लढू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य फार महत्वाचे आहे आणि आपण हे स्वीकारले पाहिजे. जरी जात वास्तव असली तरी जातीचा अभिमान बाळगावा असे काही नसते. बी.जी वाघ
म्हणतात, ‘सामान्य माणसाचा आवाज मूक होणे हे फार मोठे संकट आहे. खलील जिब्रानने म्हटले आहे की, “झाडाच्या मूक संमती शिवाय झाडाचे एक पानही गळू शकत नाही. समाजाचे
अध:पतन समाजाच्या मूक संमती शिवाय होऊ शकत नाही.’’ हे समर्पक उदा. ते देतात. बुद्धांनी सांगितले आहे की, “सत्याचा शोध स्वत:पासूनच सुरू केला पाहिजे. सत्याचा शोध भौतिक व नैतिक विकासाशी आहे. सत्य एक अनंत चिंतनाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही सत्याला अंतिम मानता येत नाही. परंतु सत्याचा संबंध मानवी विकासाशी, दु:ख मुक्तीशी असलाच पाहिजे,
अन्यथा सत्य म्हणजे निव्वळ कल्पनाविलास ठरेल असे बी.जी.वाघ म्हणतात.
प्रा.दिलीप चव्हाण म्हणतात, जे जे विचारवंत इथल्या वैविध्याचे सौंदर्य व महत्व सांगतात, त्यांना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले जातात. दमनशाही सुरू होते म्हणून आज आधुनिक काळातही विचारवंतांचा संघर्ष संपत नाही. आज आधुनिक काळात ही सर्वच आघाड्यांवर लढावे लागत आहे. शिक्षणात लोकशाही मूल्यांचा अभाव आहे. आता तर या देशात प्रश्न विचारणे देशद्रोह झाला आहे. कारण देशातला संवाद संपत चाललाय.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मांडणीतून कोरोनाकाळाचा अगदी तपशिलवार आढावा घेत वस्तुस्थिती मांडली आहे व ती समतोल विचारांची आहे. जागतिक सत्तासंघर्षही त्यांनी मांडला आहे. एकूणच वस्तुस्थिती निदर्शक असा हा लेख आहे. शाहीर संभाजी भगत यांनी सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय? हे नव्याने समजवून घ्यायला हवे,. भारतात सांस्कृतिक वर्चस्ववाद फार वर्षांपासून आहे. आपल्याकडे धर्म हा संस्कृतीचा भाग आहे. जातीव्यवस्था टिकविण्याची संपूर्ण यंत्रणा म्हणजे सांस्कृतिक राजकारण आहे असे ते म्हणतात. सत्ताधारी वर्गाचे राजकारण हे सांस्कृतिक राजकारण आहे. भारतीय संविधानाच्या २१ संकल्पांप्रमाणे नवा माणूस घडवण्याची संस्कृती व दिशा आपण अवलंबली पाहिजे.
डॉ.गणेश चंदनशिवे यांनी अण्णाभाऊ साठेंसह अनेक लोककलावंतांच्या कार्याची आठवण आपल्या लेखातून करून दिली आहे. अनेक कलावंतांनी जाचक रूढींविरूद्ध भारूडासह नाना लोककलांमधून जनजागृती केल्याचे दाखले दिले आहेत. महाराष्ट्रात लोककलावंतांची ताकद, इतिहास खूप मोठा आहे. याची अनेक उदाहरणे चंदनशिवे देतात. प्रा. गंगाधर अहिरे यांना कुटूंबातच चळवळीचा वारसा लाभल्यामुळे बालपणातच त्यांच्यावर आंबेडकरी व तमाशा जलशाचे,
त्यामुळे त्यांना ही गाणी ऐकण्याचा व गाण्याचा छंद लागला. पुढे वाचन वाढले व चळवळ समजली. त्यामुळे त्यांनी अगदी मॉस्कोपासून ते पेशवाई व डॉ. आंबेडकरांपर्यंत चर्चा केली आहे. जलसेकारांबरोबर त्यांनी तुकाराम व संतमंडळींचाही दाखला दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी कोरोना लॅाकडाऊन व स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न सखोल अभ्यास करून मांडला आहे. लॉकडाऊन मध्ये स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न उजेडात आला.तो पर्यंत ह्या मजुरांची दखल कुणी ही घेतलीच नव्हती. स्थलांतरीत मजुर तर बिनचेहऱ्याची माणसे! आपल्या महाराष्ट्राचे बहुतेक सारे आर्थिक क्षेत्र आज स्थलांतरीत मजुरांच्या हातात आहे. वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळी कामे करायला महाराष्ट्रात हजारो मजुर येतात.सोळा ते अठरा तास ते काम करतात. भारताच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ते कामाला जातात. पण ते अत्यंत दुर्लक्षित आहेत. त्यांचे शोषण केले जाते.लैंगिक शोषण तर फार भयानक आहे. अशा अनेक वस्त्या व समस्यांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.
डॉ. बाळ राक्षसे यांनी संविधान, आरोग्य सेवा, वर्ण व्यवस्था यावर अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केली आहे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तिन्ही गोष्टींची सांगड उद्देशपत्रिकेत घातली आहे. या गोष्टी एकत्र आल्या तरच जगण्याला अर्थ येतो. वर्णव्यवस्थेमुळे आपले प्रचंड नुकसान झाले, आहे. या विषमतेची अघोरी फळे आपण भोगत आहोत हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले आहे.
शमिभा पाटील यांनी ‘जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे’ या उक्तीप्रमाणे ‘आंबेडकरी कविता व परिघावरच्या कविता’ यावर उहापोह केलेला आहे. त्या म्हणतात, “१९६० नंतर आमची पहिली पिढी दलित आत्मकथने व कवितेतून व्यक्त व्हायला लागली. तो विद्रोहाचा प्रचंड झंझावातच होता.” शमिभाच्या कवितेतील आग आपल्यालाही भाजून काढते व अंतर्मुख व्हायला भाग पाडते.हा विद्रोह म्हणजे चिरकाल टिकणारी क्रांती आहे असा शमिभाचा विश्वास आहे. कायदेतज्ञ मिलन खोहर अत्यंत मार्मिक व मोजकं लिहिणाऱ्या कवयित्री आहेत पण कायद्यापुढे कवितेसाठी द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. ह्या ग्रंथातील त्यांचा लेखही अत्यंत नेटका व माहितीपूर्ण असा आहे. ‘महिलांवरील अत्याचाराला लॅाकडाऊन असेल तो दिवस कधी उजाडेल?’ असा प्रश्न त्या विचारतात.
डॉ.लक्ष्मीकांत कावळे यांनीही संविधानावर भाष्य करताना संविधानाची ध्येये व्यापक आहेत. पण ती पायदळी तुडवून अत्याचार वाढतच आहेत. इथल्या व्यवस्थेने स्त्रियांना कधीच समजून घेतले नाही. कोविड काळात स्त्रियांवर अधिक अत्याचार झाले. लोकांचे रोजगार गेले. अनेकांनी प्राण गमावले. संविधानाची प्रत जाळली जाते, संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळणे गरजेचे असते. पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे देशासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत म्हणून संविधान जपले पाहिजे, जोपासले पाहिजे असे कळकळीचे आवाहन डॉ. कावळे करतात. डॉ. सुदाम राठोड म्हणतात, “१९८०-९० नंतर भटक्या विमुक्तांच्या साहित्यावर चर्चा थांबलेली दिसते. लाखो वर्षे झाली तरी अजूनही ह्या भटकणाऱ्या टोळ्या भटकतच आहेत. ‘भटकणे’ हे त्यांच्या जगण्याचं साधन आहे. सुखाचं साधन नाही. जमीन नाही गाव नाही, स्थैर्य नाही. गुन्हेगार हाच शिक्का त्याच्यावर बसला तो कायमचाच. पत्रकार दीप्ती राऊत यांनी कोरोनाकाळाचा आढावा घेऊन त्याच्या नजरेत एकूणच सरकारच्या मदत व्यवस्थापनात ज्या त्रुटी आढळल्या त्यावर प्रकाश टाकला आहे. पहिलेच महाभयानक संकट असल्यामुळे सर्वच आघाड्यांवर नियोजनाबाबत गोंधळ
होता त्यामुळे हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले हे खरे आहे.
एकूणच ‘विचार पेरत जाऊ!’ ह्या ग्रंथातील विचारांची मुळे रूजून त्यांना भविष्यात मधुर फळे येतील ही आशा आहे. हे अनमोल विचारधन जाणत्यांच्या नजरेत भरून त्यांनी ते भावी पिढ्यांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी अनेक महाविद्यालये व विद्यापिठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते. या माझ्या मताशी आपण सारे सहमत व्हाल. लॅाकडाऊनच्या काळात
आपली सारी व्यवधाने सांभाळून डॉ. प्रतिभा जाधव व अलका कुलकर्णी यांनी जो ज्ञानयज्ञ महिनाभर चालवला त्याचे सुंदर फलित म्हणजे ‘विचार पेरत जा!’ हे पुस्तक आहे व ते घराघरात-मनामनात पोहचले पाहिजे, संग्रही ठेवावे इतके उत्तम आहे.
**प्रा.सुमती पवार,नाशिक*
मो. ९७६३६०५६४२