मुंबई :
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचार घेत आहेत. यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतर आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत आहे. काही तासांपूर्वी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार केले जात आहेत.