मुंबई / प्रतिनिधी :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षिका सौ.मयुरी शरद पवार यांना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी ५० शिक्षकांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये मागील २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात सौ.मयुरी पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
शिक्षिका सौ.मयुरी पवार या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांना कार्यानुभव विषयातंर्गत कागद तसेच
टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत त्यांच्यामध्ये कला कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल, हनुमान नगर, हिंदी कांदिवली (पूर्व) या शाळेत त्या गेल्या १६ वर्षांपासून मुलांना कार्यानुभव विषयातून कौशल्यपूर्ण शिक्षण देत आहेत.
त्यातूनच हस्त कौशल्याचे प्रशिक्षण देऊन मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करुन त्यांच्यातील अंगभूत कला – गुणांना वाव देण्यासाठी त्या विविध माध्यमातून कार्यरत असतात.त्यामुळेच अनेक विद्यार्थी हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करुन विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरत आहेत.
याशिवाय चारोळी , कविता व अन्य लिखाणाच्या माध्यमातून देखील त्या साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार जाहीर केला होता.नुकताच एका शानदार समारंभात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार श्रीमती यामिनी जाधव, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.इ.सि.चहल, अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, उपायुक्त केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.