You are currently viewing कांदळगावचा श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा 10 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक भेट सोहळा

कांदळगावचा श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा 10 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक भेट सोहळा

मालवण

कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वराचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्याशी ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळा किल्ले सिंधुदुर्ग येथे दि. १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यास असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक परंपरेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे.

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या परंपरेला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार मजबूत व भक्कम करण्याच्यादृष्टीने मालवण समुद्रातील कुरटे बेटवर भक्कम किल्ला उभारण्याचे ठरविले. सुमारे ४८ एकर परिसरात किल्ला बांधण्यासाठी त्यांनी मोरयाचा धोंडा येथे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात कुरटे बेटावर बसविण्यात येणारा दगड समुद्राच्या लाटांपुढे टिकत नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चिंतातूर बनले. त्यावेळी छत्रपतींना दृष्टांत होऊन कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर छत्रपतींसमोर एका सत्पुरुषाच्या रुपात उभे राहून म्हणाले, राजे तुम्ही घाबरू नका, तुमची चिंता दूर होईल. पण, प्रथम तुम्ही एक गोष्ट करा, येथून जवळच उत्तरेच्या बाजूला माझे स्वयंभू शिवलिंग आहे. तेथे तुम्ही जा व त्याचा प्रथम जीर्णोद्धार करा. नंतर किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल,’ या दृष्टांताने छत्रपती जागे झाले. त्यांनी सरळ उत्तरेकडील कांदळगावचा मार्ग धरला. तेथे येऊन शिवलिंगाची पूजा-अर्चा केली व त्याठिकाणी एका दिवसातच आकर्षक घुमट उभारला. त्यानंतर छत्रपतींनी श्री देव रामेश्वराकडे किल्ला बांधून पूर्ण होऊ दे, असे साकडे घातले. त्याची आठवण म्हणून घुमटाच्या समोरच वटवृक्षाचे झाड लावले. आजही तो वटवृक्ष ‘छत्रपतींचा वड’ म्हणून दिमाखात उभा आहे. त्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात दगड समुद्रात टिकू लागला आणि किल्ल्याचे बांधकाम पूर्णत्वास जाऊ लागले. यामुळेच हा भेट सोहळा आयोजित केला जातो.

१० फेब्रुवारी रोजी सकाळी श्री देव रमेशवर पालखीत बसून कांदळगाव येथून आपल्या मंदिरातून प्रस्थान करणार असून मालवण शहरांत दाखल झाल्यावर मेढा जोशी मांड येथे विश्रांतीस थांबल्यानंतर दुपारी किल्ले सिंधुदुर्गात शिवरायांच्या भेटीला निघणार आहे. श्री देव रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींकडून शेले-पागोटे देऊन श्री देव रामेश्वराला नजराणा दिला जातो. याप्रसंगी सर्व वारेसुत्रांचाही सन्मान केला जातो. देव रामेश्वर आपल्यावतीने छत्रपतींना शेले-पागोटे देऊन सन्मानित करतात. नंतर देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र व भवानी मातेसह किल्ल्यातील सर्व मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद आदान-प्रदान करतात. यानंतर सायंकाळी किल्ल्यातून निघून दांडी येथे श्री देव दांडेश्वराची भेट घेऊन श्री देव रामेश्वर मेधा राजकोट येथील मौनीनाथ मंदिरात रात्रीच्या वस्तीस थांबणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी भाविकांना दर्शन देत रामेश्वर पुन्हा कांदळगाव कडे प्रस्थान करून आपल्या राऊळात जाणार आहे. या सोहळ्यात भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा