You are currently viewing ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन 

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन 

सावंतवाडी

‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे शाळा आणि महाविद्यालय परिसरातील कायदा सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे ही सध्याची समाजाची ढासळलेली मानसिकता दर्शवतात. त्यामुळे अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन, महाविद्यालये, हायस्कुल स्तरांवर निवदने देऊन करण्यात आली.

गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तसेच, यादिवशी होणार्‍या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणार्‍या अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते.

तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’ चा बळी बनवतात. थोडक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

यामुळे होणार्‍या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवरही येत आहे. सद्यस्थितीत भारतात प्रती १८ मिनिटाला एक बलात्कार होत आहे, महिलांवरील अत्याचारांची भयावह आकडेवारी याविषयी प्रतिबंधात्मक उपायांची नितांत आवश्यकता दर्शवते. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटना या ‘डे संस्कृती’ ला विरोध करत भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. भारतीय समाजव्यवस्था उत्तम रहावी आणि अनैतिक कृत्यांमुळे होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासह युवापिढीचे प्रबोधन करण्याचीही नितांत आवश्यकता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा