You are currently viewing भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…..

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…..

बीड – 

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथील ऑनलाईन दसरा मेळाव्यात सोशल डिस्टंसिंग न पाळल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव जाणकर, खासदार भागवत कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

काल (25 ऑक्टोबर) सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गड येथे पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. कोरोना महासाथ असल्यामुळे मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरूड, राजेंद्र सानप, संदेश सानप, राजाभाऊ मुंडे यांसह अन्य 40 ते 50 जणांचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. यांच्याविरूद्ध कलम 188, 269, 270 सह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा