येत्या पाच वर्षात सक्षमपणे राबविणार
— प्रकल्प संचालक आत्मा
सिंधुदुर्गनगरी
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापनचे प्रकल्प संचालक आत्मा यांनी दिली.
या योजनेसाठी केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून, यामध्ये असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी राबविण्यात येणार आहे. संपूर्ण देशात 10 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के असा हिस्सा राहणार आहे. ही योजना एक जिल्हा एक योजना अशी राबविली जाणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आंबा या पिकाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष व प्रकल्प संचालक आत्मा हे सदस्य सचिव राहणार आहेत.
या योजनेमध्ये वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी खर्चाच्या 35 टक्के तर जास्तीत -जास्त 10 लाख पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थ्यांचे योगदान प्रकल्प खर्चाच्या किमान 10 टक्के असणे आवश्यक आहे. तर उर्वरित खर्च बँकेचे कर्ज असावे. 10 लाखापेक्षा जास्त अनुदानाचे प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहेत. सद्य अस्तित्वात असलेल्या आंबा पिकावर छोट्या प्रक्रिया उद्योगांच्या बळकटीकरणासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक उत्पन्न 5 कोटीपेक्षा कमी व यंत्रसामुग्रीवरील खर्च 1 कोटीपेक्षा कमी आहे, असे उद्योग या योजनेस पात्र राहणार आहेत.
सूक्ष्म उद्योगांचे आधुनिकिकरण करुन त्यांना संघटित क्षेत्रामध्ये रुपांतरित करणे, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, सहकारी संस्था यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, सुविधा मुल्यवर्धन बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज, ब्रँडिंग व बाजारपेठ सुविधेसाठी या योजनेतंर्गत पॅकेज उपलब्ध करुन देणे, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढविणे, अन्नप्रक्रिया उद्योगांची पत मर्यादा वाढविणे, अन्न गुणवत्ता व सुरक्षिततेच्या मानांकनामध्ये वाढ करणे, क्षमता बांधणी करणे आदि योजनांच्या उद्दिष्टांचे यामध्ये समावेश राहणार आहे.