कणकवली
गेल्या २१ वर्षात शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी सत्तेवर आहेत. पण कोकण विकासाचा एकही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ही मंडळी जनतेशी दिशाभूल आणि फसवणूक करत आहेत अशी टीका मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
श्री.उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.उपरकर म्हणाले, रखडलेले विमानतळ, परप्रांतीय ट्रॉलर्स रोखण्यासाठी गस्ती नौका, शेतकर्यांना वाजवी नुकसान भरपाई, डॉक्टरांची रिक्तपदे, खड्डेमय रस्ते, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था आदी प्रश्न गेल्या वीस वर्षापासून कायम आहेत. एकाही सत्ताधार्याला हे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून ही मंडळी प्रसिद्धी मिळवत आहेत.
ते म्हणाले, कणकवलीचे भाजपचे आमदार नीतेश राणे आता विमानतळाचा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र मागील १५ वर्षे त्यांचे वडील नारायण राणे हे सत्तेत होते. मंत्री होते, पण त्यांनाही हा प्रश्न सोडवता आलेला नाही. सध्या मेडिकल कॉलेजवरून शिवसेना श्रेयाचे राजकारण करत आहे. मात्र याच शिवसेनेला अजूनही कुडाळचे महिला हॉस्पिटल सुरू करता आलेले नाही.
उपरकर म्हणाले, गेल्या वर्षीही अतिवृष्टीमुळे भातपिकाची हानी झाली होती. यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. यंदा हेक्टरी दहा हजार म्हणजे प्रतिगुंठा केवळ १०० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचा शेतकर्यांना काहीही उपयोग होणार नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गस्ती नौका आल्याबद्दल आपल्या सत्कार करून घेतला होता. मात्र त्यांच्याच पक्षाचे मालवण शहर प्रमुख गस्ती नौका घ्याव्यात असे सांगत आहेत.
ते म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी १ कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र हा निधी देखील तत्कालीन सत्ताधार्यांना खर्च करता आलेला नाही. एकूणच सत्ताधार्यांना विकासाशी काहीही देणेघेणे नाही तर केवळ आरोप प्रत्यारोप करून राजकारण करायचे आहे.