पहिल्या टप्प्यात २१ सरपंचांचा समावेश
ठाणे येथील प्रसिद्ध रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रशिक्षण संस्था सरपंचाना करत आहे मार्गदर्शन
कणकवली
आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे हे प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात २१ नवनिर्वाचित सरपंचांना दोन दिवसाचे प्रशिक्षण आज पासून सुरू करण्यात आले. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील २१ सरपंच या प्रशिक्षणासाठी सहभागी झाले आहेत.६ व ७ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे.
यात देश आणि राज्याच्या विकास योजना कशा राबवाव्यात,विकास निधी कसा मिळवावा,ग्रामसभांमध्ये कशा पद्धतीने ग्रामविकासाचे ठराव संमत करावेत या अशा सर्वच बाबतीचे प्रशिक्षण दिले जात आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नुकत्याच ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या.ग्रामपंचायत ही विकासाची मोठी केंद्र ठरणार आहेत. त्यासाठी हे सरपंच प्रशिक्षण महत्वाचे ठरले आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर निवडक २१ सरपंचांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे यात सरपंचांना कर्तव्ये, अधिकार,योजना, निधी, कार्यपद्धती ग्रामसभा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही राज्यातील एक नामवंत आणि दर्जेदार प्रशिक्षण संस्था आहे. अशा दर्जेदार संस्थेत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आमदार नितेश राणे यांच्या मुळे नवनिर्वाचित सरपंचांना मिळाली आहे.