*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री कुलकर्णी लिखित अप्रतिम गझल रचना*
*वृत्त वनहरीणी*
चहूदिशांनी प्रहार झाले काच मनाची तडकत आहे
या स्वप्नांच्या ओझ्यासोबत जीवन मजला पळवत आहे
धावत जातो सौख्या मागे तरी ओंजळी रित्याच असती
क्षणाक्षणाला जाणवते की जीवन म्हणजे कसरत आहे
मांडत असता डाव नव्याने नियती सारा उधळून जाते
तप्त उन्हाच्या झळां मुळे हा वसंत माझा करपत आहे
भोगतोच मी जन्मापासुन भोग सरेना अजून सुद्धा
आक्रसलेली वेळ अशी का घटापळाने सरकत आहे
तोल मनाचा सावरताना मिळेच ना आधार जरासा
उलटा माझ्या पाठीवरती खंजीर कोणी खुपसत आहे
कुणा दाखवू अशा वेदना कुणी न उरले येथे माझे
प्रसन्न दिसतो जरी चेहरा मन दुःखाने डहुळत आहे
समोर दिसतो पहा किनारा तिथे पोचता येतच नाही
भयाण वादळ भवती माझे भरकटलेले गलबत आहे
जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक