You are currently viewing बांदा-देऊळवाडी येथे ५ एकर काजू बागायती आगीत जळून खाक.

बांदा-देऊळवाडी येथे ५ एकर काजू बागायती आगीत जळून खाक.

बांदा

शहरात देऊळवाडी भरडाला आज दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, निलेश मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केलेत.
आज दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. दुपार असल्याने व वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर, सुंदर सावळ यांची काजू बागायती जळून खाक झाली. तसेच सागवान, जांभूळ झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने सायंकाळी उशिरा आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
सरपंच श्रीमती नाईक, धारगळकर, मोरजकर यांच्यासह शिक्षक हंसराज गवळे, सुनील पाटील, देवेंद्र अहिरे, सोहेल जमादार, साहिल खान, साहिल जमादार, नईम खान, आयान मलिक, आयान खतिब, पापलीन खान, किसमत अल्ली, अबू कमर, रेहान शेख, समिम शाह, मोसिन खतिब, आदिल आगा यांनी मदतकार्य केले.
आग आगल्यानंतर लागलीच अग्निशमन बंबला कळवून देखील सावंतवाडी, कुडाळ, मालवण नगरपालिकेचा बंब उपलब्ध झाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचनामा झाला नसल्याने अधिकृत नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा