*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार श्री.जयराम धोंगडे यांच्या “जय बोले” काव्यसंग्रहाचे श्री.नामदेव ज्ञानदेव आबने यांनी केलेलं पुस्तक समिक्षण*
*कोण बोले? “॥ जय बोले ॥”*
जयराम धोंगडे, नांदेड
================================
कवीच्या काव्याचे रसपान आणि मूल्यमापन हे सामान्य वाचक तसेच रसिकच करीत असतात. तद्वतच मी एक सामान्य वाचक केवळ रसपान (मूल्यमापन करण्याएवढा मी मोठा नाही) म्हणूनच माझे पुत्रवत कविमित्र श्री.जयराम धोंगडे यांच्या स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या “जय बोले” काव्यसंग्रहाबाबत सहज मनोगत, मोकळ्या मनाने लिहिताना मला आनंद लाभतो आहे.
[ ‘नामा म्हणे’ यांस ‘ जय बोले’ चा सप्रेम नमस्कार!
बाबा, प्रेम व आदरपूर्वक भेट! ]
१३ मे २०२२ रोजी हा काव्यसंग्रह लाभला! कंसातील वरील मजकूर यासाठी नमूद केला की, जयराम यांनी मोठ्या आपुलकीने, प्रेमाने व आनंदाने शब्दधनाचा खजिना भेट दिला. आनंद झाला. यावरून जयराम यांची माणूस जोडण्याच्या सहज स्वभावाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही नेहमी येतात तसे त्यांचे फोन येत. ते घरीच असल्याने आणि साहित्याची गोडी असल्याने जयराम काव्यलेखनाकडे आकर्षित होत गेले. आईच्या आजारपणात आईची सेवा करता करता जे लिहित होते, ते आवर्जून आईजवळ वाचन करीत. इथे मला ही बाब प्रामुख्याने जाणवली ती अशी की, आईची सेवा-भक्ती ही शारदा-सरस्वती यांचीच भक्ती! म्हणून ” भक्ती केली आणि शक्ती लाभली ती लेखनाची!” जयराम लिहिते झाले, आपल्या कवितांच्या रूपाने बोलू लागले. तो हा अंतर्बाह्य सुंदर काव्यसंग्रह – ‘जय बोले!’
सहज, साध्या व सरळ शब्दांतून ते सर्व सामान्यांच्या भावना आपल्या काव्यातून व्यक्त करतात …
दाखविले जग। केले तू सजग॥
वात्सल्याची धग। तुज ठायी॥
केले तू तयार । देऊनी संस्कार॥
जगाचा बाजार । दाखविला॥
झिजविली काया। सोसता सोसता॥
आम्हासी पोसता। जन्म गेला ॥
(आई ‘विसी’)
अशा रितीने जयराम आईचे ऋण आणि त्या ऋणाची जाणीव व्यक्त करतात. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या संत गाडगे महाराज यांच्या चरणी लीन होऊन ते लिहितात…
हाती घेऊनी खराटा
साफ केल्या वहिवाटा।
असा निष्काम कर्मयोगी
अवतरला याच जगी ।। (पान३०)
आज चाखतो गोड फळे
शिकते मुलगी धन्य कुळे,
घडले ज्योती सावित्रीमुळे
नतमस्तक झाले कर जुळे! (पान ३१)
स्री शिक्षणाचा पाया घालून, झेंडा रोवून महिलांना हक्काचे दालन खुले करून आभाळाएवढ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी विनम्र भावनेने ते नतमस्तक होतात. वरील उदाहरणावरून कवीची सामाजिक जाणीव व थोर आदर्शाचा आदर दिसून येतो.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसात राहिला नाही, माणुसकी तर सोडाच पण माणूस एक दुस-याला ओळखायलाही तयार नाही. ही मनाची घालमेल, हा सल कवीला सलतो. त्यांना आलेला संताप व्यक्त करताना ते लिहितात…
जिवास चैन नाही साराच घोळ झाला
क्षणात आज पाहा ना गदरोळ झाला!
पाहून लाज वाटे माणसाची मनाला
सांगून जीव माझा लाल इंगोळ झाला! (पान ३६)
माणूसपण का हरवले? हा विचार त्यांना सतावतो. पण त्याची कारणे देताना दोष कुणाला द्यावा? हाही प्रश्न कवीला पडतो ते लिहितात…
काय द्यावा दोष कोणा?
आज नाही होश कोणा!
दौलतीचा माज का रे?
पूरले का कोश कोणा? (पान ४२)
सारे काही ठीक असतांना एरवी माणूस आपल्यातच गर्क, दंग राहतो आणि दु:ख संकट आले की मग मायबाप, देवधर्म आठवतात, उपरती होते…
काय करू देवा?
काढलीस हवा!
देऊळे ही तुवा
बंद केली ॥१॥
उतला मातला ।
वसा जो टाकला॥
उपरती त्याला।
झाली आता॥ ॥४॥ (पान ५८)
अरे माणसा, उपरती झाल्यावर तरी याचा विचार करायला हवा असे ते म्हणतात…
जगलास तू कसा त्यालाच मोल आहे
स्वार्थीच फार जगले आलें तसेच गेले!
उरणार काय मागे होणेच राख आहे!
धनदांडगे ते, धन सोडून तसेच गेले! (पान ६४)
अशा रितीने जीवनाचे हे सत्य माणसाला अगदी सरलतेने सांगण्याचा प्रयत्न ते आपल्या शब्दातून करतात. कारण…
गाळून घाम जेव्हा पैसा खिशात येतो
सन्मान लाभतो अन् उद्धार मानवाचा! (पान ७२)
आणि अशा कष्टाच्या, मेहनतीच्या कमाईमुळे आपला संसार रथ शांततेने, समाधानाने, आनंदाने पुढे पुढे जात असतो, हे सांगण्यास आणि सल्लाही देण्यास ते विसरत नाहीत. म्हणतात…
जीवनात आहे। सुखदुःख सारे।।
चाक हेच फिरे । सदोदित ॥१॥
स्नेहाचे वंगण । प्रेमाचे अंगण॥
कनवाळू मन । सुखावते ॥२॥
मिळुनी राहता । संयमी बोलता॥
शांत राही माथा । संसारात॥ ॥४॥ (पान ८३)
अशा रितीने कौटुंबिक, सामाजिक विचार, जीवनातील अनेकविध प्रसंगातून जाताना आलेल्या कडूगोड अनुभवांना शब्दफुलांचा हार रसिकांना अर्पण करून एक प्रकारे आदरच केला आहे. आपल्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा!
जीवनानुवांनी सजलेला आणि चांगले विचार सांगण्यासाठी धजलेला श्री.जयराम धोंगडे यांचा आनंद देणारा असा हा काव्यसंग्रह….
“॥ जय बोले ॥”
नामदेव ज्ञानदेव आबने राहू,
पुणे.
दि.३ जानेवारी २०२३