– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. आज आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कोरोना संदर्भात घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिस्क जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी उपस्थित होते.
तालुका स्तरावरील यंत्रणा राबवून कोरोनाच्या चाचण्या कराव्यात अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, चाचण्या करण्यासाठी तसेच नमुने गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एका व्हॅन उपलब्ध करून द्यावी. तसेच मोबाईल स्वॅब कलेक्शनची सोय आरोग्य यंत्रणेने करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील इतर आजार असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलीत झाली आहे. त्या माहितीच्या आधारे इतर आजार असणाऱ्या नागरिकांचीही कोरोना तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने व्यवस्था करावी. त्यासाठी मोबाईल टेस्टींगची सोय उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील कोविड – 19 च्या चाचण्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्ह्यातील डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची माहिती केंद्र सरकारला पाठविण्याविषयी करावयाच्या कार्यवाहीविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यांना कोविड – 19 संदर्भात असलेल्या अडीअडचणी व समस्या व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेतल्या.
या व्हीडिओ कॉन्फरन्स नंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड 19 च्या परिस्थितीबाबत सविस्तर आढावा घेतला