कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल,पडवे व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेत्रतपासणी शिबिर’ झाराप येथे ग्रामपंचायत सभागृहात विश्वकर्मा प्रकट दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते.यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाने असे मेळावे घेऊन ज्ञाती बांधवांमध्ये एकता वाढीस लागते,या एकतेचा लाभ घेऊन सुतार समाजाच्या वतीने रक्तदान शिबीरे आयोजित करून आपल्या समाजाबरोबरच इतर समाज बांधवांना रक्तदान करून ‘रक्तदान सारख्या श्रेष्ठदानाने समाजाचा उत्कर्ष करावा,त्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन श्री विश्वकर्मा सुतार समाजाच्या या जिल्हा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी नेत्रतपासणी शिबिराचे उदघाटन झाराप सरपंच दक्षता मेस्त्री,सुतार समाज जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री,नेत्रचिकित्सक डॉ संजय जोशी,उपसरपंच मंगेश गावकर,किरण सुतार,सुतार समाज माजी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री,व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजन पांचाळ यांनी केले.